Fri. Jan 21st, 2022

सांगलीत अखेर लालपरी रस्त्यावर

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. गेले कित्येक दिवस राज्यातील एसटी बससेवा बंद होती. मात्र सांगली बस आगारातून आज अखेर लालपरी रस्त्यावर धावली आहे. सांगलीत एसटी बससेवा पुन्हा पूर्वपदावर आल्यामुळे लोकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

   १५ दिवसापासून बंद असणारी लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे. सांगली मिरज सिटीबस जनतेच्या सेवेत दाखल झाली असून सांगलीतील इस्लामपूर, तासगाव, जत मार्गावर एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. जिल्ह्यात प्रतीक्षा यादीमधील एकूण ५० चालक, वाहक रुजू झाले आहेत. सांगली पुणे स्वारगेट शिवशाहीच्या दररोज २० फेऱ्या होणार आहेत. तसेच जसजसे एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील तसे एसटी बसच्या फेऱ्या वाढवणार असल्याची माहिती सांगली एसटी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  एसटी महामंडळ राज्यात विलिनीकरण्याच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. तसेच उच्च न्यायालयाने आदेश काढल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरूच आहे. तसेच यासाठी राज्यसरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीचा निर्णय सरकारला मान्य असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. मात्र मागणी पूर्ण होत नाही तोवर कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *