Sun. Oct 17th, 2021

‘पहाटेच्या सरकारच्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन’

महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे लोकसभा निवडणूक लढवत असून, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रचारार्थ बेळगावमध्ये प्रचार सभा घेतली. या सभेनंतर आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘आज जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी सुद्धा फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवत आहे,’ असं म्हणत राऊत यावेळी म्हणाले. त्याचबरोबर पहाटेच्या शपथविधीबद्दलही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

‘सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणं महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही, मात्र ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वातच विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत. पाठिंब्याची गरज होती, त्यावेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या. आज जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी सुद्धा जर फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल, तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे’

‘अजित पवार यांना चांगलं माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा. ज्यावेळी पहाटे सरकार बनलं, दुपारी कोसळलं, त्यानंतर पुन्हा ते बनलं. या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत’,असा टोलाही राऊत यांनी लगावला.

‘बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता. महाराष्ट्र एकीकरण समिती फार महत्त्वाची संघटना आहे. एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवत आहे आणि त्याला पाठिंबा देणं हे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. इथे मतभेद असले तरी चालतील मात्र तिथे असायला नकोत. शिवसेना-काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी प्रत्येक मराठी माणसाने तिथे गेले पाहिजे. तिथे लोकांचा उत्स्फुर्तपणे पाठिंबा मिळतोय. यावेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार चांगली मुसंडी मारतील’, असा अंदाजदेखील राऊत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *