‘सतीचा चाफा’… श्रद्धाळू ग्रामस्थांची अजब प्रथा

देवाच्या चरणी भाविक नेहमीच श्रद्धेपोटी फुलं वाहतात. मात्र पुण्यानजीकच्या टिटेघर या गावात एक वेगळीच प्रथा आहे. येथे गावाच्या सीमेवर असणाऱ्या ‘सतीचा चाफा’ हे ग्रामस्थांचं श्रद्धास्थान आहे. विशेष म्हणजे येथे फुलं किंवा फळं अर्पण करण्याऐवजी दगड अर्पण करून लोक नतमस्तक होतात.
या गावात चाफ्याच्या झाडाखाली सतीची वीरगळ आहे. त्याला ‘सतीचा चाफा’ असं संबोधलं जातं. पण विशेष म्हणजे चाफ्याच्या झाडाखाली असूनही या वीरगळीला चाफाच काय, कोणत्याही झाडाची फुलं वाहिली जात नाही. इथे चक्क दगड वाहून सतीची पूजा केली जाते.
टिटेघर गावच्या सीमेवर असणारा सतीचा चाफा हा गावकऱ्यांचे श्रद्धेचे स्थान बनलेले आहे. या सतीआईची पूजा ही बेलफुले नव्हेतर लहान मोठे दगड अर्पण करून केली जाते. येणारा प्रत्येक गावकरी हा सतीआईला दगड वाहून नतमस्तक होऊनच पुढे जातो.
गावातील कुणाचंही लग्न असो किंवा शुभकार्य… पहिला मान हा सतीच्या चाफ्याला असतो. सतीला दगड अर्पण करूनच शुभकार्याची सुरुवात केली जाते. आजही ही परंपरा कायम आहे. गावातील जेष्ठ मंडळी आवर्जून ही आख्यायिका सांगतात.
मात्र या गावातील ही परंपरा श्रद्धा की अंधश्रद्धा या पेक्षा या परंपरेमुळे गावातील महिलांना मान आणि सन्मान हा अधिक दिला जातो हे महत्वाचे आहे असं म्हणावं लागेल.