नाशकात पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद

मुंबई, पुणे, औरंगाबादच्या पाठोपाठ आता नाशिकमधील शाळासुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमधील कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारपासून नाशिकमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नाशिकमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ५०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशकातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे.
दोन लस घेणाऱ्यांना त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश मिळणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या प्रवेशाबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. येत्या ८ जानेवारीपासून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशाबाबत निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच १० वर्षाच्या आतील आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना मंदिरात परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.