‘अफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरु’ – आदित्य ठाकरे

गेल्या १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजार प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट सापडल्यामुळे जगभर चिंता वाढली आहे. अशातच आज दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान आता गेल्या १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजार प्रवासी मुंबईत आल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकेर यांनी दिली आहे. तसेच हे प्रवासी मुंबईतून इतर शहरातही गेले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण किती प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत याची शोधप्रक्रिया सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच परदेशातून आलेल्या सर्वानाच संपर्क साधणार असल्याचे, ते म्हणाले.
‘ओमिक्रॉन’मुळे राज्यात नवी नियमावली
ओमिक्रॉन विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरीकांचे पूर्ण लसीकरण असणे आवश्यक आहे. तसेच लसीच्या दोन डोसनंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी युनिव्हर्सल पास ग्राह्य धरला जाणार आहे.
दुकाने आणि मॉल्समध्ये जाण्यासाठी नागरिकांनी लसीचे दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस आणि कॅबमध्ये प्रवास करता येईल. लस घेतली नाही तर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांच्या आत आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी संख्येनुसार नियमावली तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक वागणूक अनिवार्य आहे.