100 हून अधिक बलात्कार करणारा ‘तो’ अखेर अटक!

अल्पवयीन मुलीना फूस लावून त्यांच्यावर बलात्कार करणारा विकृत सिरियल रेपीस्ट रेहमत कुरेशी याचा ताबा नवी मुंबई पोलिसांकडून तुळींज पोलिसांनी घेतला आहे. नालासोपाऱ्यात त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृत आरोपीने गेल्या काही वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आणि नालासोपाऱ्यातील अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले होते. त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती. तो एकदाही पकडला गेला नसल्याने पालक आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते.
कुरेशी अल्पवयीन मुलींना विविध कारणं सांगून घेऊन जायचा आणि शहरातील निर्जन स्थळी नेऊन बलात्कार करायचा. त्याने नवी मुंबई, ऐरोली, ठाणे, मुंबई येथेही अशाच प्रकारे अनेक अल्पवयीन मुलींना आपले सावज बनवले होते. २०१६ पासून पोलीस आणि गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती. पण तो हाती लागत नव्हता. त्याने आता नालासोपाऱ्यात आपला मोर्चा वळवला होता आणि इकडच्या मुलींना सावज बनवायला सुरवात केली होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात बलात्काराचे 15 गुन्हे दाखल होते.
तुळींज पोलिसांनी त्याचा माग काढल्यानंतर तो मीरा रोड येथे राहत असल्याचे आढळून आलं. नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलं. त्याचा ताबा मंगळवारी तुळींज पोलिसांनी घेतला.
अंगावर काटा आणणाऱ्या घटना
14 सप्टेंबर 2018. नालासापोरा येथील 13 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीच्या घराजवळ एक अनोळखी इसम आला. तुझ्या वडिलांना दुकानातील सामान घ्यायचे आहे, अशी भूलधाप देऊन तिला सोबत नेले. तुझे वडील जवळच आहेत असे सांगून एका इमारतीच्या गच्चीवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर आठवड्याभरातच त्याने अशाच पध्दतीने नालासोपाऱ्यामधील दोन अल्पवयीन मुलींना सावज बनवले आणि एकच खळबळ उडाली. हा अनोळखी इसम अल्पवयीन मुलींना विविध कारणं सांगून घेऊन जायचा आणि शहरातील निर्जन स्थळी नेऊन बलात्कार करायचा.
कसं पकडलं या विकृत नराधमाला?
नवी मुंबई पोलिसांनी या विकृताच्या सीसीटीव्ही वरून छायाचित्रे काढली होती आणि त्याच्या हजारो प्रती शहरात वाटल्या होत्या. त्याची माहिती देणाऱ्यासाठी 25 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. पण त्यांना दोन वर्षांपासून यश आलं नव्हतं. नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी हे आव्हान स्वीकारलं. पण केवळ सीसीटीव्ही चित्रिकरण आणि त्या छायाचित्रावरून त्याला पकडणे सोपं नव्हतं. त्याला पकडण्याबरोबरच त्याने आणखी कृत्य करू नये, यासाठी मोठी जनजागृती करणं आवश्यक होतं. तुळींज पोलिसांनी मग तीनही अल्पवयीन मुलींचे सविस्तर जबाब घेतले. हा विकृत कसा बोलतो, त्याच्या वर्णनावरून त्याचं रेखाचित्र बनवलं. नालासोपाऱ्यात बलात्काराची घटना घडली त्या संखेश्वर नगर येथील सीसीटीव्हीचे चित्रण पोलिसांना मिळालं. त्याची भित्तीपत्रकं, हॅण्डबिलं तयार करून जागोजागी लावण्यात आली.
गणेशोत्सवाचा काळ होता. शाळांमध्ये, वस्त्यावस्त्यांमध्ये पोलीस त्याची छायाचित्रे घेऊन फिरू लागले. विसर्जनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी त्याची भित्तीपत्रके, मोठी फलके लावली. संखेश्वर नगर येथील सीसीटीव्हीत तो दिसला. तो नालासोपारा स्थानकाजवळ जाताना दिसला. अन्य दोन घटनांमधील सीसीटीव्हीतूनही तो रेल्वेच्या स्थानकाच्या दिशेने जाताना दिसला. ज्या अर्थी तो रेल्वे स्थानक परिसरात दिसला त्या अर्थी तो ट्रेनने आला असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. मग पोलिसांनी नालासोपारा नंतरच्या, वसई, नायगाव, भाईंदर, मीरा रोड स्थानकातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरवात केली. जवळपास 500 तासांचं चित्रण पोलिसांनी तपासलं. हे सोप्पं काम नव्हतं. लाखो प्रवाशांच्या गर्दीतून त्याला शोधायचे होतं. ते शोधत शोधत तो मीरा रोडला उतरल्याचे लक्षात आलं. सर्व घटना या बहुतांश बुधवारी घडत होत्या. तो मीरा रोड येथील असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो मोबाईलवर बोलत असताना दिसलं. त्यामुळे पोलिसांनी डम्प डेटा काढला, हजारो कॉल्सची पडताळणी कऱण्यास सुरवात केली. आता तो मीरा रोडला असल्याचे लक्षात आले. तो मीरा रोडला असल्याचे समजल्यानंतर तुळींज पोलिसांबरोबर नवी मुंबई, ऐरोली, ठाण्याच्या पोलिसांनी मीरा रोडला सापळा लावला. एका पानाच्या टपरीवर हा विकृत सिगारेट ओढत असलेला दिसला. नवी मुंबई पोलिसांनी लगेच त्याच्या मुसक्या आवळल्या.
विकृताचा धक्कादायक जबाब!
या विकृताचे नाव रेहमत कुरेश असून तो मीरा रोडला राहणारा आहे. त्याने सांगितलेल्या माहितीनंतर पोलिसांनी झोप उडत गेली. त्याने किमान शंभरहून अधिक मुलींना आपले सावज बनवले होतं. तो ट्रेनने नवी मुंबई, ठाणे, नालासापोऱ्यात जायचा. एखादी मुलगी दिसली की दोन ते तीन दिवस तिच्यावर पाळत ठेवायचा आणि मग तिला फूस लावून न्यायचा. एका महिन्यात सरासरी तो दोन मुलींना शिकार बनवत होता. त्याच्याविरोधात 20 हून अधिक पोलीस ठाण्यात बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.
वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी संपुtर्ण ऑपरेशन अगदी अभ्यासपुर्ण पध्दतीने, संयमाने हाताळणे आणि गेली अनेक वर्ष मोकाट असणारा हा विकृत सापडला.
हाच विकृत कुर्ल्यातील सिरियल किलरही होता. २०१० मध्ये कुर्ला येथे अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या करणारा सिरियल किलरची दहशत निर्माण झाली होती. त्याचा शेवटपर्यंत तपास लागला नव्हता. तो सिरियल किलर अन्य कुणी नसून हाच विकृत रेहमत कुरेशी होता. त्याने दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येची कबुलीही दिली आहे.
कुरेशीला वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. तेथे त्याला 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रेहमतच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.