400 रुपयांसाठी नोकराने भंगारात विकली महागुरुंची सन्मानचिन्ह
अमृतने ती सर्व सन्मानचिन्हे केवळ 400 ते 500 रुपयांना विकल्याचे कबुल केले आहे.

मराठी चित्रपटांमधील गाजलेला चित्रपट ‘आयत्या घरात घरोबा’मध्ये केदार किर्तीकरांबरोबर घडलेला प्रसंग यंदा सचिन पिळगावकर यांच्याबरोबर सत्यात घडला आहे. सचिन पिळगावकर यांच्या कार्यलयातून त्यांना आणि त्यांच्या वडिलांना मिळालेली सन्मानचिन्ह चोरीला गेल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही चोरी कोणी अनोळखी व्यक्तीने केली नसून त्यांच्याच विश्वासू नोकराने केल्याचे उघडकीस आले आहे.
नेमकं काय घडलं ?
सचिन पिळगावकर आणि त्यांचे वडिल शरद पिळगावकर हे सिनेमासृष्टीतील नावजलेले दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.
सचिन पिळगावकर आणि त्यांच्या वडिलांना अनेक उत्कृष्ट कामांसाठी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
ही सर्व सन्मानचिन्हे सचिन यांनी जुहू येथील कार्यालयात ठेवले होते.
मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी जूहू येथील कार्यालयाचे डागडुजीचे काम सुरु होते.
याच संधीचा फायदा घेत सचिन यांच्या विश्वासू नोकराने चक्क त्यांचे सन्मानचिन्ह चोरल्याचे उघडकीस आले.
सचिन यांची पत्नी सुप्रिया यांनी कार्यलयात भेट दिल्यावर सन्मानचिन्ह दिसली नसल्यामुळे नोकराला विचारणा केली.
मात्र डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे सन्मानचिन्हे धुळीमुळे खराब न होण्यासाठी गोणीत ठेवल्याचे नोकराने सांगितले.
मात्र आता ती सापडत नसल्याचे नोकराने सुप्रिया यांना सांगितले.
सुप्रिया यांनी ही सर्व घटना सचिन यांना सांगितल्यानंतर सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सचिन आणि सु्प्रिया यांना नोकर अमृत याच्यावरच संशय असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
अमृतने ती सर्व सन्मानचिन्हे केवळ 400 ते 500 रुपयांना विकल्याचे कबुल केले आहे.
इतके वर्षे मेहनत घेऊन कामावलेली सन्मानचिन्हे केवळ 400 ते 500 रुपयांसाठी विकली गेल्यामुळे सचिन यांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला आहे.