वाधवान यांच्यामागे पवार कुटुंब, किरीट सोमय्या यांचा आरोप

बडे उद्योगपती वाधवान बंधूंच्या महाबळेश्वर प्रवासांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वत्र लॉकडाऊन असतानाही वाधवान यांनी आपल्या कुटुंबियांसह खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास केला असल्याची माहिती समोर आली. ५ गाड्यांमधून तब्बल २३ जणांनी यावेळी प्रवास केल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी गृहमंत्रालयातील विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी पत्र दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे विरोधकांनी आता सरकारवर निशाणा साधला आहे. हा प्रकार महाबळेश्वरच्या स्थानिकांनी केलेल्या तक्रारीमुळे उघडकीय आलाय. आता प्रवास करणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाधवान बंधू हे आधीच DHFL घोटाळ्याप्रकरणी जामिनावर सुटलेले आहेत.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वाधवान कुटुंबियांचे शरद पवार यांच्याशी घरगुती संबंध असल्याचा आरोप केला आहे. वाधवान यांच्यामागे पॉवरफूल पवार कुटुंब असल्याचं सोमय्या म्हणाले. या प्रकरणी जरी अधिकाऱ्यांवर कारवाई केली असली, तरी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील जबाबदार असून त्यांची गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
देशमुख यांनी विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना पूर्ण चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. रात्री दोन वाजता ट्विट करून ही माहिती दिली.