शिवसेनेचं ठरलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय
SHIVSENA AND MAHAVIKAS AAGHADI WILL FIGHT LOCAL BODIES ELECTION TOGETHOR

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: राज्यात महाविकास आघाडीसह सत्ता स्थापनेची शिवसेनेची खेळी यशस्वी झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय बुधवारी शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकांबाबत शिवसेना रणनीती आखत असून याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीनं विजय संपादन केला. त्यानंतर शिवसेना महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली पुढील निवडणुका लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.