Fri. Dec 3rd, 2021

NCP नेत्याची हत्या, शिवसेना जिल्हा उपप्रमुखाला बेड्या

दीपक चव्हाण, सांगली

सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अवघ्या काही तासात अटक करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख दिनकर पाटील यांच्यासह तिघांचा समावेश आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ पोलिसांनी हत्येनंतर अवघ्या काही तासात आरोपींना बेड्या ठोकल्या.

शिवसेना पदाधिकारी दिनकर पाटील यांनी पुतण्याच्या मदतीने राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची काल रात्री हत्या केली होती.

हत्येप्रकरणी दिनकर बाळासो पाटीलसह अभिजीत युवराज पाटील, विनोद बाजीराव पाटील यांना अटक झाली आहे.

पूर्ववैमनस्यातून मनोहर पाटील यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.

मयत मनोहर पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती होते.

हरोली- देशिंग भागातील शेतात हल्लेखोरांनी वार करुन त्यांची हत्या केली होती.

हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते. मनोहर पाटील यांना उपचारासाठी मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित केलं होतं.

आठवड्याभरातील दुसरी हत्या

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या होऊन चार दिवस उलटले नसताना राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू होते.

दोन्ही हत्या प्रकरणातील आरोपी वेगवेगळे आहेत. सांगलीतील वेगवेगळ्या तालुक्यात हत्या घडल्या असल्या, तरी दोन्ही खून पूर्ववैमनस्यातून झाले आहेत. राजकीय नेत्यांचेच हत्याकांड घडत असल्याने जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने हालचालीना वेग देत हल्लेखोरांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *