धक्कादायक! आईची हत्या करत शरीराचे मांस खाण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : आईचा खून करणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दारुसाठी पैसे न दिल्याने सुनील कुचकोरवी याने आपल्या आईची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नराधम मुलाला बेड्या ठोकल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे.
कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत २८ ऑगस्ट २०१७ रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. दारुसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरुन सुनीलने आई यल्लवा कुचकोरवी हिचा खून केला होता. अत्यंत क्रूर खून खटल्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला
कावळा नाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा आणि सत्तुराने शरीराचे तुकडे करुन क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सुनील रामा कुचकोरवी यास गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी त्यास दोषी ठरवले होते. कौर्याची सीमा गाठणारा दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने न्यायालयाने ही कठोर शिक्षा देण्यात आली.