कोरोनाग्रस्तांच्या सेवेत व्यस्त डॉक्टरांच्या मुलीची कविता

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. लॉकडाऊन अजून सुरू आहे. या काळात सर्वत्र लोक आपआपल्या घरात राहून कोरोनापासून बचाव करत असताना पोलीस, डॉक्टर तसंच जीवनावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी मात्र आपले प्राण धोक्यात घालून जनतेची सेवा करत आहेत. अशावेळी कोरोनाग्रस्तांसाठी दिवसरात्र सेवा करणाऱ्या आपल्या डॉक्टर वडिलांसाठी त्यांच्या मुलीने लिहिलेली कविता व्हायरल होत आहे. डॉ. संतोष नागरे यांची दहा वर्षांची लेक अनुष्का हिने वडिलांसाठी ही भावपूर्ण कविता रचलेली आहे. इंग्रजीतल्या ‘रेन रेन गो अवे, कम सम अनादर डे’ या लहान मुलांच्या कवितेच्या चालीवर ‘कोरोना कोरोना गो अवे, डोण्ट कम बॅक अनादर डे’ असे या कवितेचे शब्द आहेत.

या कवितेत तिने डॉक्टर करत असलेलं कार्य, त्यांचे अथक प्रयास यांचं वर्णन केलं आहे. त्यांना आता आरामाची गरज आहे. मात्र त्यासाठी आपण सर्वांनी घरातच राहणं कसं आवश्यक आहे, हे लिहिलं आहे. तसंच कोरोनापासून बचाव होण्यासाठी कशी काळजी घ्यायला हवी, हे देखील तिने कवितेतून सांगितलं आहे.

या कवितेमुळे लहान मुलांमध्येही किती प्रमाणात जागृती आहे, याचं दर्शन घडतं. तसंच आज जगावर ओढावलेल्या परिस्थितीचा परिणाम लोकांवर कसा होतोय, ते देखील समजतं.