‘७ एप्रिलपर्यंत राज्य कोरोनामुक्त होईल’

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना ७ एप्रिलपर्यंत पूर्ण राज्य कोरोनामुक्त होईल असा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला आहे. तेलंगणामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे ७० रुग्ण आढळून आले आहेत. त्यांतील ११ जण उपचारांनंतर बरोही झाले आहेत. त्यामुळे तेलंगणात आता केवळ ५८ रुग्णच आहेत. हे लवकरच बरे होतील. त्यांच्यानंतर हे राज्य कोरोनामुक्त होईल, अशा विश्वास तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.
तेलंगणामध्ये लॉकडाऊन कडक शिस्तीत पाळला गेला होता. जर लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडायचा प्रयत्न केला, तर थेट लष्करी कारवाई करू, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला होता. या कारवाईदरम्यान रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील. अशी वेळ येऊ द्यायची नसेल, तर स्वयंशिस्त पाळा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. परिणामी, तेलंगणामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागली आहे.
परदेशातून आलेल्या २५,९३७ लोकांवर सरकार लक्ष ठेवून असल्याचं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या लोकांच्या क्वारंटाईनचा कालावधी ७ एप्रिलला संपणार आहे. जर यांच्यात आणखी लोकांची भर पडली नाही, तर ७ एप्रिलपर्यंत तेलंगणा राज कोरोनामुक्त होईल, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.