Thu. Jan 21st, 2021

शिक्षणाची गोडी, त्यासाठी थर्माकोलची होडी!

भारतात डिजिटल इंडियाचे वारे वाहत आहेत. विनोद तावडे राज्यातील सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी मोठ्या घोषणा देत असतात. मात्र परभणी जिल्हयातील मंजरथ या गावातील विद्यार्थ्यांना आपले शालेय शिक्षण घेण्यासाठी चक्क थर्माकोलच्या होडीतून गोदावरी नदी ओलांडून बीड जिल्ह्यातील मोठे मंजरथ या गावी जावं लागतं. तसंच तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचं पाणी मंजरथ पात्रात मोठ्या प्रमाणात येतं. त्यामुळे लहान आणि मोठे मंजरथ या गावांमधील संपर्क तुटतो. ही स्थिती जवळपास आठ महिने राहते. त्यामुळे या परिस्थिती विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या मंजरथ गावातील लोकसंख्या जेमतेम पंधराशे एवढी आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पाथरी गाव येथून किमान 27 कि.मी अंतरावर आहे, मात्र गावांमधील रस्त्यांची स्थिती दयनीय असल्याने राज्यपरिवाहन महामंडळाने 15 वर्षांपूर्वीच गावाची एस.टी सेवा बंद केली. गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र त्यापुढील शिक्षणासाठी मात्र या गावात हायस्कूल नाही. गावात बससेवा नसल्याने येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. गोदावरी नदीपत्राच्या पलीकडे बीड जिल्हातील मांजलगाव तालुक्यामधील मोठा मंजरथ या गावात माध्यमिक शाळा आहे. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी लहान मंजरथ या गावातील काही नागरिकांनी शक्कल लढवत थर्माकोलची होडी तयार केली आहे. नदीपत्राच्या दोन्ही काठांना मोठी दोरी बांधली आहे. विद्यार्थ्यांना याथर्माकोलच्या होडीत बसवून दोरीला धरून नदी पार करून शाळेत जावं लागतं. मात्र यासाठी विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. आपली मुलं शाळेतून येईपर्यंत पालकांच्या जीवात जीव राहत नाही. मात्र नाईलाजास्तव पालकांना मुलांना अशा प्रकारे शाळेत पाठवावं लागत आहे.

देशात आणि राज्यात शिक्षणावर केला जाणारा हजारो कोटींचा खर्च, सरकारच्या डिजिटल इंडिया योजना या सर्व गोष्टींचे परभणी जिल्ह्यातील मंजरथ गावात अक्षरशः वाभाडे निघाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षं लोटली. मात्र अद्यापही ग्रामीण भागातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळालेल्या नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ओढीपायी थर्माकोलच्या असुरक्षित होडीत बसून शाळेत जावे लागते, ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितीच अशोभनीय गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *