Jaimaharashtra news

मोदी साहेबांची काळजी घ्या – आनंदीबेन पटेल

पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्या, असे आवाहन करून मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नवा वाद निर्माण केला आहे.

रेवा गावातील ग्रामस्थांशी संवाद साधताना,  ‘मोदी साहेबांची काळजी घ्या,’ असे ग्रामस्थांना सांगत असतानाचा आनंदीबेन पटेल यांचा Video व्हायरल झाला आहे.

आनंदीबेन पटेल यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पटेल या एका घटनात्मक पदावर आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करायला नको होते.

भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांना काम करायचे असेल तर राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि लोकसभा निवडणूक लढवावी, असे आव्हान काँग्रेसच्या मीडिया प्रमुख शोभा ओझा यांनी दिले.

शनिवारी आनंदीबेन यांनी रीवा सौर ऊर्जा प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पात नोकरी मिळावी, अशी विनंती रीवातील ग्रामस्थांनी त्यांच्याकडे केली.

त्यावेळी आनंदीबेन पटेल यांनी अधिकाऱ्यांना एक यादी तयार करण्याचे आदेश दिले. ‘भविष्यात अशाच प्रकारच्या संधी मिळतील.

मात्र तुम्हाला मोदी साहेबांची काळजी घ्यावी लागेल,’ असे त्या ग्रामस्थांना सांगत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

 

Exit mobile version