Fri. May 20th, 2022

तालिबान, अल-कायदा: मुस्लिम दहशतवाद्यांची नजर काश्मिरवर? 

 
विशेष (०३/०९/२०२१): तालिबानने अफगणिस्तानात सत्ता काबीज केल्यावर त्याचे भारतावर काय परिणाम होणार याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तविले जात होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी भारताकडून तालिबानसोबत अधिकृत बोलणी सुरु झाल्याचे वृत्त हाती आले होते.
 
 
सुरुवातीला तालिबानने देखील भारताने आमच्यावर हल्ला करू नये, अशी विनंतीवजा इच्छा व्यक्त केली होती. मात्र आज तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या एका काश्मीरविषयक वक्तव्याचे परिणाम भारत-तालिबान चर्चेवर होऊ शकतात.
 
 
तालिबान प्रवक्ता सुहेल शाहीन याने आज ‘काश्मीरमधील मुसलमानांसाठी बोलण्याचा अधिकार आहे’ असा दावा केला आहे. विशेष म्हणजे काल अल-कायदाने तालिबानच्या अफगाणिस्तानातील विजयाबद्दल आनंद व्यक्त करणारे वक्तव्य जारी केले होते. त्यावेळी अल-कायदाने काश्मीर हे आता ‘नेक्स्ट टार्गेट’ असल्याचे म्हटले होते. अल-कायदाच्या या भूमिकेनंतर लगोलग तालिबान प्रवक्त्याने दिलेले वक्तव्य चिंतेचा विषय आहे.
 
 
काश्मीरच्या अनुषंगाने कलम ३७०बाबत भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाने जिहादी प्रवृत्ती चवताळुन उठल्या होत्या. परंतु काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्यात दहशतवादी संघटनांना यश आले नव्हते.
 
 
अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यावर तालिबानसारख्या कट्टरपंथी मुस्लिम दहशतवाद पुन्हा एकदा डोके वर काढतो का, अशी भीती जगभरातून व्यक्त करण्यात येत होती. त्याचे कारण अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यावर तालिबान पूर्वीपेक्षा शक्तिशाली झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.