विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्या प्रकरणी शिक्षकाला अटक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थिनीला संगणक खोलीत नेऊन तिथे तिच्याशी अश्लील चाळे केल्याच्या शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेत दोन शिक्षक होते. त्यापैकी शाळेतील एक शिक्षक गुरुवारी ट्रेनिंगसाठी गेले असता जयप्रकाश दत्ताराम तेरसे या शिक्षकाने विद्यार्थिनीला संगणक कक्षात बोलावून घेतले आणि संगणक खोलीत तिच्याशी अश्लील चाळे केल्याची घटना गुरुवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी शाळा सुरु असताना घडली. घाबरलेल्या विद्यार्थिनीने शिक्षकाच्या तावडीतून कशीबशी सुटका करत घर गाठले.घाबरलेल्या विद्यार्थिनीने कोणाशीच घरी संपर्क न साधला एकटीच राहू लागली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला. आईने तिला शाळेत का जात नाही असं खोदून खोदून विचारले. तर घडलेल्या सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला. याबाबत आईने तिच्या वडिलांना कल्पना दिल्यानंतर हा सर्व प्रकार त्या शाळेतील शिक्षण समिती अध्यक्षाच्या कानावर घातला.
या नंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली मात्र त्याठिकाणी तेरसे शिक्षक उपस्थित नव्हता. यानंतर तात्काळ वेंगुर्ले पोलिसांना याबाबत खबर दिली. सायंकाळी वेंगुर्ले पोलिसांसमवेत तेरसे शिक्षक शिरोडा येथे राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला अटक करण्यात आली. या शिक्षकाने यापूर्वीही असे अनेक प्रकार केले असल्याची चर्चा आहे. बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8,10,12 व भा द वी कलम 354,अ (1 )(1) (4) अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस पोलिसांनी अटक केले आहे.