Sat. Aug 13th, 2022

आजपासून ९४वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात

आजपासून नाशिकमध्ये ९४वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात झाली आहे. कुसुमाग्रज स्मारकापासून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरुवात झाली असून सायंकाळी चार वाजताच्या सुमारास साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा नाशिकमधल्या एमईटी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

कुसुमाग्रज स्मारकापासून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या ग्रंथदिंडीत ढोलताशांचा गजर ऐकायला मिळाला. संमेलनात सहभागी रसिकांनी लेझीम खेळत दिंडीत सहभाग नोंदवला. मल्लखांब हा साहसी खेळ प्रकारही यावेळी पाहायला मिळाला.

वादाची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाच्या वाटेत अनेक विघ्न उभी राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. आधी वेगवेगळे वाद, मग कोरोनाचे संकट, बदललेल्या तारखा, ओमायक्रॉन व्हेरिएंट, सगळ्यात शेवटी पाऊस आणि त्यासोबतच जोवाड चक्रीवादळ यासर्व अडचणी साहित्य संमेलनाला अडथळा  आणत होत्या. मात्र  साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरणच असल्याप्रमाणे आधी राजकीय मानापमान नाट्य रंगले. नाशकात राहणाऱ्या केंद्रीय मंत्री भारती पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळे महापौरांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितले.

नाशिकमध्ये सुरू झालेले मराठी साहित्य संमेलन आजपासून पुढील दोन दिवस रंगणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.