…म्हणून निर्भयाचे दोषी ढसाढसा रडले
मृत्यू डोळ्यासमोर बघुन निर्भया प्रकरणातील दोषी ढसाढसा रडले

दिल्लीत 7 वर्षापूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणातील दोषींना आज दिल्लीतील तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. आणि तब्बल सात वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाला. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता या चारही नराधमांना फासावर लटवण्यात आलं.
या चारही दोषींना तिहार तुरुंगातील क्रमांक 3 च्या फाशीघरात फाशी देण्यात आली. जल्लाद पवन यांनी ही फाशी दिली. ही फाशी देण्यासाठी जल्लाद पवनला 60 हजार रुपये दिले गेले.
फाशी देण्यापूर्वी पहाटे सव्वातीन वाजता चारही दोषींना झोपेतून उठवण्यात आलं. मात्र मृत्यूची चाहूल लागल्यामुळे चौघांपैकी एकही जण झोपलेला नव्हता. नंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. आंघोळीनंतर त्यांना चहा प्यायला देण्यात आला. मात्र त्यांनी चहा प्यायला नकार दिला.
त्यानंतर नियमाप्रमाणे चारही दोषींना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली. त्यानंतर त्यांना काळा पायजमा आणि कुडता देवुन कपडे बदलण्यास सांगण्यात आले. त्यापैकी विनय नावाच्या दोषीने कपडे बदलण्यास नकार दिला आणि रडत रडत माफीही मागू लागला.
चारही दोषींच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. यावेळी दुसऱ्याही एका दोषीनं रडत रडत खाली लोटांगण घालत दयावया केली. यानंतर त्यांचे चेहरे काळ्या कापडाने झाकून त्यांचे हात मागे बांधण्यात आले. आणि त्यांना फाशी घरात नेण्यात आले.
फाशीच्या तख्तावर चढवून त्यांचे पाय बांधुन गळ्यात फाशीचे दोर घालण्यात आल्यानंतर तुरुंग क्रमांक 3 च्या अधिक्षकांनी मंजुरी दिल्यावर पवन जल्लादने त्यांना फाशी दिली. यानंतर 6 वाजता चारही दोषींची तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तब्बल सात वर्षानंतर आपल्या मुलीला न्याय मिळाल्यामुळे निर्भयाची आई भावुक झाली होती.