Jaimaharashtra news

मिरवणुकीत वाजला डीजे,मात्र लोकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा कारण…

अनेकांनी आजपर्यंत आनंदाच्या क्षणी डीजे लावून नाचणाऱ्या मिरवणुका पाहिल्या असतील. मात्र मृतक मुलाच्या अंतिम इच्छेपोटी शनिवारी नागपूरमध्ये डीजे लावून चक्क अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. सोबतच लोकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या.

नेमकं प्रकरण काय ?

ही अंत्ययात्रा होती 22 वर्षीय महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची. शुक्रवारी अकोला येथील शास्त्री स्टेडियम जवळ असलेल्या ‘क्रीडा प्रबोधनी’मध्ये प्रणवने गळफास लावून आत्महत्या केली.

नुकत्याच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे त्याच्या आत्महत्येबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रोहतकमध्ये २८ जानेवारीला झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये प्रणव पराभूत झाल्याने तो निराश झाला होता. याच नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

प्रणवने लिहिलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये, “बाबा मला माफ करा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केलं नाही,” असं लिहिलं होतं.

आपली अंत्ययात्रा डीजेच्या तालावर निघावी, अशी इच्छा प्रणवने वडिलांकडे बोलून दाखवली होती. त्यामुळेच त्याच्या वडिलांना आपल्या तरुण मुलाच्या अंत्ययात्रेला डीजे लावून लाडक्या मुलाला अखेरचा निरोप दिला आहे.

Exit mobile version