पानिपत…लढा स्वाभिमानाचा
मराठे आणि अब्दाली यांच्यातील अद्भुत लढा

शशांक पाटील , मुंबई : – मकर संक्रातीने २६० वर्षापूर्वी मराठी मुलखाला कधीही न विसरता येणारं दुःख दिलं. ते म्हणजे ‘पानिपत’. मराठे आणि अफगानिस्तानचा तत्कालिन राजा अहमदशहा अब्दाली यांच्यातील १४ जानेवारी, १७६१ रोजी झालेले हे युद्ध इतिहासातील काही सर्वांत भीषण युद्धांमध्ये मोजलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य अटकेपार नेणारे मराठ्यांचे सेनापती पेशवे पानिपतात अग्रभागी होते. मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराला गती देण्याऱ्या पेशव्यांचा धाक इतका होता की, हिंदुस्थानातल्या राजांना धाकात ठेवणाऱ्या मुघलांनाही देशाचा कारभार मराठ्यांच्या मर्जीने चालवणे भाग पडू लागले होते. त्यामुळे, साहजिकपणेच देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ही मराठ्यांवर आली. अशात नजीब खान या रोहिला सरदाराने हिंदुस्तानावर आक्रमणासाठी अफगानिस्तानचा राजा अहमदशहा अब्दाली याला आमंत्रण दिले. अब्दाली तेव्हा बलवान आणि क्रूर शासक म्हणून ओळखला जात असे. अशा अब्दालीने भारतावर स्वारी करत तो दिल्लीच्या दिशेने निघाला. कर्तव्याप्रमाणे अब्दालीला रोखण्यासाठी तेव्हा दिल्लीजवळ होते मराठा सरदार दत्ताजी शिंदे. पण, तुंटपुज्या सैन्यासह दत्ताजींचा अब्दालीसमोर निभाव लागणं अशक्य होतं. त्यामुळे, दत्ताजींना वीरमरण आलं आणि पानिपतच्या युद्धाचा जणू शंखध्वनी झाला. दत्ताजी धारातीर्थी पडल्याची बातमी शनिवारवाड्यावर येऊन पोहचली आणि तमाम मराठ्यांमध्ये बदला घ्यायची ठिणगी पेटली. या ठिणगीला आगीत बदलवले ते स्वाभिमानाने.
मात्र, तेव्हाची उत्तरेतील परिस्थिती आणि एकापाठोपाठ एक लढाया केल्याने मराठा सैन्याची स्थिती यु्द्ध करण्याचा निर्णय हुशारीचा नव्हता. पण, आपल्या खमक्या सरदाराला मारणाऱ्या आक्रमक अब्दालीला धडा शिकवण्यासाठी पहिल्या बाजीरावांचे पुतणे सदाशिवराव भाऊ स्वतःच्या सोबत मोजके सरदार आणि सैन्य घेऊन पानिपतला निघाले. अशारितीने स्वाभिमान आणि मायभूमीच्या रक्षणाचा हा लढा सुरू झाला. पण, हा लढा एकतेचाही होता. कारण जात-धर्म यात अडकलेल्या हिंदुस्तानात घडलेले पानिपतचे युद्ध मात्र बरेच वेगळे होते. मुळात मराठ्यांचं सैन्यच जणू एकतेच प्रतिक होत. विविध जातींबरोबरच इब्राहिम गार्दी सारखा निष्णात तोफखाना प्रमुखही याच सैन्यात होता.
पानिपतावर युद्ध पार पडले. बऱ्याच सुल्तानी आणि अस्मानी संकटामुळे मराठे युद्ध हरले. तेव्हापासून या युद्धाचा संदर्भ मराठ्यांच्या पराभवाची आठवण म्हणून उरलाय. तत्कालीन मराठी मुलखातून घरटी किमान एकजण शहिद झाला. त्याची तुलना आजच्या स्वार्थी राजकीय जय-पराजयाशी का व्हावी? पानिपताची लढाई जगाला स्वाभिमानाची व्याख्या सांगणारा अद्भूत लढा होता. हा विचारही महत्वाचा आहे. कारण, अब्दाली याने संपूर्ण हिंदुस्तानावर आक्रमण केलेलं असताना जाट, राजपूत, यादव अशा अनेकांना त्याचा सामना करावा वाटला नाही. मात्र १५०० किमी दूर असणाऱ्या मराठ्यांनी मात्र स्वाभिमानासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी आपली संपूर्ण ताकद लावून लढा दिला. त्यामुळे, पराभव झालेल्या या युद्धानेही अखंड हिंदूस्तानाला दाखवून दिलं कि मराठे हे मोडतील पण वाकणार नाहीत.
(लेखात प्रसिद्ध झालेली मते लेखकाची असून त्या मतांशी संस्था सहमत असेलच असे नाही.)