Tue. Apr 20th, 2021

गौरी लंकेश प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गेल्या दोन वर्षापासून गौरी लंकेश हत्या प्रकरणाची कारवाई सुरू होती. दरम्यान आता प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीवकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कतरास मधून ऋषिकेश देवडीवकरला विशेष पथकाने ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी शुक्रवारी न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे.

ऋषिकेश गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. दरम्यान तो झारखंडमध्ये ओळख बदलून राहत असल्याची खबर पोलिसांच्या हाती लागली होती. विशेष पथकाने त्याची दखल घेत झारखंडमधील कतरास येथे गुरूवारी धाड घालून त्याला ताब्यात घेतले.

ऋषिकेश देवडीवकर हा मुळचा औंरगाबादमधील असून तो कतरास मधील एका पेट्रोल पंपावर कामाला होता. अधिक तपासासाठी त्याला बंगळूरमध्ये आणण्यात येणार आहे. आतापर्यंत गौरी लंकेश ह्त्या प्रकरणात 18 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पोलिस अधिक कसून तपास करत आहेत.

गौरी लंकेश एक पत्रकार असून कन्नडमधील लंकेश पत्रिका या वृत्तपत्राच्या संपादक होत्या. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 मध्ये करण्यात आली होती.

तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या बंगळूर मधील घरात घूसून त्यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *