Mon. Jan 24th, 2022

दारूबंदी व्हावी म्हणून महिलेचा अनोखा पराक्रम

राज्यात दारूबंदी करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. मात्र या उपक्रमांचा व्यसना लोकांवर काही फरक पडत नाही. दारूमुळे अनेक कुटूंब उद्धस्त झाल्याच्या घटना समोर येतात. मात्र दारूबंदी होत नाही. याविरोधात प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान या दारूबंदी होण्यासाठी वर्ध्यातील एका महिलेने जे केले ते ऐकून सगळेच थक्क झाले.

नेमकं प्रकरण काय ?

वर्ध्यातील वायफडमध्ये भर चौकात महिला एक डपकी आणि ग्लास घेऊन ओट्यावरती बसली होती. झाडाच्या आडोशाला बसलेल्या या महिलेकडे गावकऱ्यांचे फारसे लक्ष देखील नव्हते. पण एक- दोन तास उलटल्यावर भर दुपारी तिच्या अवती-भवती गर्दी जमायला लागली.

उत्सुकता म्हणून गावातील काही सुजाण नागरिकांनी देखील विचारपूस केली. पण समोर आले ते नवलच. महिला चक्क दिवसाढवळ्या चौकात गावठी दारू विकत होती. काही दारुड्यांनी तिच्याकडून दारु विकतही घेतली.

आशाबाई आनंदराव उईके या ४५ वर्षाच्या महिलेचा उदरनिर्वाह रोजमजुरीतून चालतो. घरी नवरा , मुलगा आणि लग्नाच्या वयात आलेली मुलगी असे कुटुंब आहे. नवरा दारूशिवाय राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. वडील आणि मुलगा दोघेही रोज दारू पितात. दारूने घरात दररोज वाद होतो.

घरात रोजमजुरी करून कमाई करणारी ती एकटीच असल्याने ती वैतागली होती. घरातील करते पुरुष दारूच्या आहारी गेल्याने आशाबाईंचा पारा चढला. गावात दारूविक्री थांबावी यासाठी त्यांनी प्रयत्नही केले, पण दारूबंदी झाली नाही.

अखेर आशाबाईंनी आक्रमक पवित्रा घेत स्वतःच दारूविक्रीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. हातात दारूची डपकी घेऊन ही महिला चौकात पोहचली आणि दारू विकायला लागली. एक – दोन तासात ग्राहकही वाढले. पण अचानक हे दारूविक्री विरुद्धचे आंदोलनच असल्याचे दारुड्यांच्याही लक्षात आले.

पुलगाव पोलिसांनी दारू बंद केली नाही तर आपण बाजारातील मुख्य चौकात दारू विकू अशी भूमिकाच या महिलेने घेतली आहे. दारू विक्रेत्यांना वठणीवर आणा ! असे आवाहनच या महिलेने पोलिसांना केले आहे.

माहिती मिळताच पुलगाव पोलीस गावात पोहचले. गावात पोहचून समझोता करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे दारू विक्रेत्यांवर निशाणा साधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी दारूविक्रेत्यांची नावे सांगण्याचे आवाहन केले आहे. महिलेच्या अशा भर चौकातील दारू विक्रीने जिल्ह्यातील दारू बंदीवर प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *