Thu. Jan 20th, 2022

राजपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नाही

या वर्षी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाचा प्रस्ताव नाकारला गेला आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथाचा प्रस्ताव देखील नाकारण्यात आला आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांचा चित्ररथ 26 जानेवारीला पाहायला मिळणार नाही.

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्याने राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.

महाराष्ट्राचं आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ प्रजासत्ताक दिनी दिसू नये, यामागे राजकीय षडयंत्र आहे का?, असा सवाल राऊतांनी आपल्या ट्विटद्वारे केला आहे.

तसेच आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का ? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी केला.

हेच जर काँग्रेसच्या राजवटीत घडलं असतं तर भाजपाने बोंबाबोंब केली असती, अस म्हणतं भाजपवर राऊतांनी टीका केली.

राजकारण बाजुला ठेवून या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

दरवर्षी 26 जानेवारीला दिल्लीत राजपथावर संचालन केले जाते. या संचालनात राज्यातील संस्कृती आणि परपंरेचं दर्शन घडवून दिलं जातं.

या संचलनासाठी ठराविक राज्यांना रोटेशन पद्धतीने संधी दिली जाते.

महाराष्ट्राकडून यंदा मराठी रंगभूमीची 175 वर्ष या संकल्पनेवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने राज्याच्या चित्ररथाचा प्रस्ताव नाकारला.

महाराष्ट्राच्या चित्ररथाचा 2005, 2008 आणि 2013 साली प्रस्ताव नाकारण्यात आला होता.

महाराष्ट्राला अनेकदा चित्ररथासाठी पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राने चित्ररथासाठी याआधी 6 वेळा पहिला क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्राने 2018 सालच्या चित्ररथासाठी पहिला क्रमांक पटकावला होता. 2018 साली शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा या संकल्पनेवर हे चित्ररथ साकारलेलं होतं.

महाराष्ट्रा सोबत पश्चिम बंगालचा देखील चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आला. पश्चिम बंगालची 5 वर्षात चित्ररथ नाकारण्याची ही दुसरी वेळ आहे.

याआधी 2015 ला पश्चिम बंगालचा चित्ररथ नाकारण्यात आला होता.

2020 वर्षासाठी कन्याश्री योजनेवर बंगालचा चित्ररथ करण्याचा प्रस्ताव होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *