Tue. Apr 20th, 2021

नक्षलवादावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ची गरज?

नुकत्याच झालेल्या गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान आणि एक सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागले. गेले अनेक वर्षे गडचिरोलीची ओळख ‘रेड कॉरिडॉर’ म्हणून आहे. या जिल्ह्यात नक्षलवाद अगदी नसानसांत भिनावा तसा भिनलेला आहे. 1 मे ला झालेला हल्ला हा किती बारकाईने अभ्यास करून केला गेला, आणि त्यात कशा प्रकारचे इनपुट नक्षलवाद्यांना मिळाले हे आश्चर्यकारक आहे.

देशातील 10 राज्यं नक्षलवादाच्या विळख्यात आहेत. यामध्ये 74 जिल्हे नक्षलपीडित आहेत. यामध्ये गडचिरोलीचा नंबर पहिला लागतो. इथली भौगोलिक परिस्थिती ही नक्षलवाद्यांसाठी पोषक असल्यामुळे त्याचाच फायदा घेत गेली अनेक वर्षं इथे ही चळवळ आपलं अस्तित्व टिकवण्यासोबतच वाढवत आहे.

इथे असलेलं घनदाट जंगल, पहाडीभाग यांची ढाल करून इथे वारंवार हल्ले केले जातात.

हा भाग अतिशय घनदाट आहे. त्यामुळे रात्रीची वेळ ही नक्षलवाद्यांसाठी सुवर्णकाळ असतो.

रात्रीचा फायदा घेऊन गावागावांत जाऊन जाळपोळ करणं, जमिनीमध्ये आईईडी (Improvised Explosive Device) लावणं सहज शक्य होतं.

या भागात बहुसंख्य आदिवासी समाज आहे.

त्यांच्यावर वर्चस्व गाजवून त्यांना सतत आपल्या दहशतीत ठेवणं आणि त्यासाठी अशा प्रकारचे हल्ले करणं आता गडचिरोलीत नेहमीचंच झालंय.

नक्षलवाद… ‘वाद’ की विचारधारा?

नक्षलवाद खर तर एक विचारधारा आहे. या विचारधारेतून सुरू झालेली ही चळवळ आता उग्ररूप धारण करत असून पोलीस आणि नक्षल यामधील संघर्ष आता अधिक तीव्र होत आहे. या भागाचा विकास नक्षलवाद्यांना नको आहे. त्यामुळे विकासकाम आणि पोलीस हे नक्षलवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट आहेत.

गडचिरोलीमध्ये मागील दोन वर्षात नक्षलविरोधी कार्यवाहीत पोलिसदलाला मोठ्याप्रमाणात यश मिळालं आहे. काहीच दिवस आधी भामरागड मध्ये दोन नक्षलवादी नेत्यांना कंठस्नान घालण्यात C60 च्या जवानांना यश आलं. त्यामुळे कसनासुरमध्ये झालेल्या घटनेपासून ते आत्ताच्या या घटनेला प्रत्युत्तर देण्यात येईल हे सर्वश्रुत होतं. देशात सुरू असलेली लोकसभा निवडणूक आणि 1 मे असा दुग्धशर्करा योग साधत C60 च्या जवनाना लक्ष्य करण्यात नक्षलवादी यशस्वी ठरले.

यामध्ये अनेक चुका झाल्याचं आता समोर येत आहे. या भागातील SDPO वादग्रस्त असून त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असल्याची माहिती आता समोर येतेय. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला देखील या अधिकाऱ्याचा त्रास असल्याची माहिती दबक्या आवजात गडचिरोली मध्ये सुरू आहे.  मात्र प्राथमिक चौकशीमध्ये या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविल्याने याची भूमिका संशयास्पद असल्याचं स्पष्ट होतेय.

नक्षलवाद सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बदलतोय असं अभ्यासक सांगतात.

नक्षलवाद जंगलासोबतच आता शहरातदेखील आपले हातपाय पसरवतोय.

एका समुदायाला सोबत घेऊन आपले विचार शहरात पोहोचवण्यात नक्षलवादी यशस्वी होतोय.

गेल्या अनेक कारवायांचा विचार केला, तर शहरी भागात देखील नक्षलवादाची पाळंमुळं किती घट्ट होत आहे हे लक्षात येईल.

 

दहशतवादाहूनही घातक नक्षलवाद!

देशाच्या सीमेवर असलेल्या शत्रू जितका देशासाठी घातक आहे, तितकाच घातक देशांतर्गत असलेला नक्षलवाद आहे. नक्षलवाद्यांमुळे देशांतर्गत आव्हान पोलीस दलापुढे आहे. ज्या पद्धतीने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून नवा भारत दाखवून देण्यात सरकार यशस्वी ठरलं त्याच पद्धतीची कार्यवाही आता यांच्यावर देखील होणं आवश्यक आहे.

23 मे ला येणारं सरकार कोणाच हे स्पष्ट होईल. मात्र नव्या सरकारपुढे नक्षलवाद देखील एक आव्हान असेलं मात्र आता नक्षलवाद ठेचून काढण्याची मागणी देशांर्गत जोर धरू लागली आहे.  नक्षलवाद्यांना उत्तर देताना फक्त गोळीच एकमेव पर्याय नसून या भागात विकास आणि शिक्षण क्षेत्रात देखील अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. आज नक्षलवाद बंदुकीची भाषा जरी करत असला तरी वैचारिक चळवळ ही वैचारिक बदलाने घालविता येणं शक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *