मारहाणीचा बदला म्हणून ट्रक चालकाने फोडल्या दोन दुचाकी

किरकोळ वादातून मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतीच एक नागपुरमधील मारहाणीची घटना उघडकीस आली आहे.
शुल्लक कारणांवरून एका ट्रक चालकाला मारहाण झाली. त्या मारहाणीचा बदला म्हणून ट्रक चालकाने जे केले ते पाहून लोकांना धक्का बसला. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
ट्रक चालकाला 12 मार्चच्या रात्री कंट्रोलवाडी परिसरात ट्रकमधील साहित्य गोदामात सोडायला जात होता. तिथे एक बाईक आणि ऍक्टिवा वर जाणारे दोन दुचाकीस्वार समोरून हटत नव्हते. त्यामुळे ट्रक चालकाने वारंवार हॉर्न वाजविले.
मात्र मद्यपान केलेल्या दोन्ही दुचाकी स्वारांना ट्रक चालकाचे असे हॉर्न वाजवणे आवडले नाही. त्यामुळे दोघांनी ट्रक चालकाची बेदम पिटाई करत त्याला रक्तबंबाळ केले.
रागावलेल्या ट्रक चालकाने ही मारहाण करणाऱ्या दोन्ही दुचाकीस्वरांना धडा शिकवण्यासाठी ट्रक मधून लोखंडी रॉड काढले. मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार आपापल्या दुचाकी सोडून पळून गेले होते.
यानंतर तापलेल्या ट्रक चालकाने हातातल्या लोखंडी रॉडने भर रस्त्यात दोन्ही दुचाकी तोडण्यास सुरूवात केली. त्याने दुचाकीचा अक्षरश चुराडा करून टाकला. ट्रक चालकाचा रौद्र अवतार पाहून रस्त्यावरची वाहतूकही थांबली.
तो दोन दुचाकी का फोडतोय हे लोकांना कळले नाही. मात्र अनेकांनी ट्रक चालकाचा व्हिडीओ बनविला. दोन्ही दुचाकींना फोडल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन तिथून निघून गेला.
यानंतर दोन दिवसांपूर्वी वायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी त्याला शोधून काढले. तसेच त्याच्या विरोधात गाड्या फोडल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या फिर्यादीनुसार दोन्ही दुचाकीस्वारांवर मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.