U-19 WC, Final : बांगलादेश ठरला विश्वविजेता

क्रिकेट विश्वाला नवा विश्वविजेता मिळाला आहे. अंडर -१९ वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात बांगलादेश विजयी झाला आहे. बांगलादेशने टीम इंडियावर डकवर्थ लुईस नियमानुसार ३ विकेटने विजय मिळवला आहे.
टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी १७८ धावांचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना पावसाच्या व्यत्ययाने काही वेळ सामना थांबवण्यात आला. त्यामुळे बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार १७० धावांच आव्हान मिळालं.
बांगलादेशने हे आव्हान ७ विकेट गमावून पूर्ण केलं.
बांगलादेशकडून परवेझ एमोनने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तर कॅप्टन अकबर अलीने ४३ धावा केल्या.
या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना बांगलादेशची आश्वासक सुरुवात झाली.
बांगलादेशच्या परवेझ ईमन आणि तंजिद हसन या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली.
बांगलादेशला पहिला झटका रवि बिश्नोईने दिला. तंजिद हसनला १७ धावांवर बाद केलं.
यानंतर टीम इंडियाने बांगलादेशला ठराविक अंतराने झटके दिले. परंतु माफक आव्हान असल्याने टीम इंडियाला आपले आव्हान राखता आले नाही.
टीम इंडियाकडून सर्वाधिक ४ विकेट रवि बिश्नोई याने घेतल्या. तर सुशांत मिश्राने २ आणि यशस्वी जयस्वालने १ विकेट घेतली.
याआधी बांगलादेशने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यामुळे टीम इंडियाला बॅटिंगसाठी मैदानात यावे लागले.
टीम इंडियाला पूर्ण ५० ओव्हरही खेळता आले नाही. टीम इंडियाचा डाव ४७.२ ओव्हरमध्ये आटोपला. टीम इंडियाने १० विकेट गमावून १७७ धावा केल्या.
टीम इंडियाकडून सर्वाधिक ८८ धावा यशस्वी जयस्वाल यांनी केल्या. टिळक वर्माने ३८ तर ध्रुव जुरेलने २२ धावा केल्या.
टीम इंडियाला अपेक्षित अशी सुरुवात मिळाली नाही. टीम इंडियाला पहिला झटका ९ धावावंर लागला. दिव्यांश सक्सेना अवघ्या २ धावा करुन माघारी परतला. टीम इंडियाची सुरुवात धिमी झाली.
यानंतर यशस्वी जयस्वाल आणि टिळक वर्मा या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. टीम इंडियाच्या ५० धावा १७ व्या ओव्हरच्या सुरुवातीला पूर्ण झाल्या.
टीम इंडियाला दुसरा धक्का टिळक वर्माच्या रुपाने लागला. यशस्वी जयस्वाल आणि टिळक वर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. १०३ धावसंख्या असताना टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली. टिळक वर्मा ३८ धावा करुन तंबूत परतला.
यानंतर पुढील ३ ओव्हरनंतर टीम इंडियाने तिसरा विकेट गमावला. कॅप्टन प्रियम गर्ग अवघ्या ७ धावा करुन माघारी गेला.
सातत्याने चांगली कामगिरी करत असलेला यशस्वी जयस्वाल देखील ८८ धावांवर आऊट झाला. यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने आपले विकेट गमावले.
टीम इंडियाच्या ७ खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
बांगलादेशच्या अविशेक दासने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर शोरीफूल इस्लाम आणि तनझीम हसन सकीबने २-२ विकेट घेतल्या. तसेच रकीबूल हसन यानेही एक विकेट घेतली.