जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरू ठेवायला राज्य शासनाची परवानगी

कोरानाचा संसर्ग पसरू नये म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र अशा परिस्थितीत लोक घाबरून जाऊ नयेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. नागरिकांनी सरकारने घातलेल्या नियमांचं पालन करावं. घाबरून जाऊ नये, बाजारात गर्दी करू नये यासाठी महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
औषधालयं, किराणा मालाची दुकानं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आता रात्रभर उघडी राहणार आहेत यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. लोक लॉकडाऊनच्या काळात संभ्रमित होऊन दुकानांमध्ये गर्दी करू लागली आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग कठीण झालं आहे. यासंर्भात आज बैठक झाली. या बैठकीत मुख्य सचिव, महापालिका आयुक्त तसंच आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी ग्राहकांनी पाळायचं सामाजिक अंतर, स्वच्छता, निर्जंतुकीकरण यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर ही बैठक झाली.
लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत आधी सुस्पष्टता नसल्याने लोकांनी दुकानांत गर्दी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे भाजीपाला, किराणा माल खरेदी करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. यातून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासला गेला. मुख्यमंत्र्यानी याचाच विचार करून एकाच वेळी लोकांनी अशा दुकानांत गर्दी करू नयेत, म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.