Sun. Apr 18th, 2021

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं’

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कठोर करण्यात आलेले आहेत, शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदीचादेखील इशारा दिला आहे. मात्र, टाळेबंदीला भाजपसह मनसेनेदेखील विरोध दर्शवलेला आहे. याशिवाय, सत्ताधारी पक्षातदेखील याबाबत एकमत नसल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागल्याने, काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या उद्देशाने आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर संपर्क साधून सहकार्य करावे, असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. “राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत टाळेबंदीचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केलं आहे.” असं ट्विट मनसेकडून करण्यात आलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *