Sat. Aug 13th, 2022

युनिवर्सल ट्रॅव्हल पास नाही तर लोकलचा प्रवास नाही

मुंबई: कोविड १९ संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली मुंबई लोकल सेवा अद्यापही सुरु झालेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, शिक्षक यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र बोगस ओळखपत्रांच्या आधारे अनेकजण नियमांचे उल्लंघन करत लोकलने प्रवास करत आहेत. मागील काही दिवसांत अशा प्रकारची अनेक प्रकरणं समोर आल्याने याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकल प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास देण्यात येणार आहे.यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पत्रही लिहिले आहे. आपत्ती व्यवस्थापनाने प्राधिकारण ऑनलाईन सिस्टमद्वारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना एक QR कोड दिला जाणार आहे. हा QR कोड तिकीट घरांवर दाखवल्यानंतरच तिकीट दिलं जाणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील सूचना लवकरच रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येतील.

युनिव्हर्सल पास कसा मिळवाल?

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना हा पास मिळणार असून त्यासाठी https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.html साईटवर जाऊन मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारण्यात येईल. तो सेंड झाल्यानंतर तुम्ही ट्रॅव्हल पास डाऊनलोड करु शकता.

दरम्यान, सध्या मध्य रेल्वेतून १८ लाख तर पश्चिम रेल्वेतून ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यापैकी जवळपास ५० टक्के प्रवासी बनावट ओळखपत्र बनवून तिकीट मिळवत असल्याचा अंदाज आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी डेल्टा प्लस वेरिएंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसंच लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.