अकोल्यात सराफा व्यापाऱ्यावर पोलीस कोठडीत ‘अनैसर्गिक लैंगिक’ अत्याचार

अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेत एका सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाला असल्याचा प्रकार घडला आहे. पीडित आरोपी सराफा व्यापाऱ्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
९ जानेवारी रोजी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरी करत सोने खरेदीप्रकरणी शेगावतील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला रात्री ३ वाजता शेगावातून अटक केली होती. शेगावातून अकोल्यात आणतांना गाडीतच आरोपीला प्रचंड मारहाण करण्यात आली. रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे यांनी मारहाण केली.
त्यानंतर २० जानेवारी रोजी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर या आरोपी व्यापाऱ्याने अकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. तसेच या प्रकरणाचा तपास शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.