उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष लढणार

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ३४ जागांसाठी उमेदवाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्यात आली नाही. दरम्यान, आता उत्पल पर्रीकर यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.
उत्पल पर्रीकर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पणजीमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. उत्पल पर्रीकर म्हणाले, ‘मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिले होते. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत पक्ष मजबूत करायचा असून वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, मला पणजीतून उमेदवारी देण्यात आली नाही. दोन वर्षांपूर्वी आलेल्यांना पणजीमध्ये तिकिट देण्यात आले. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष निवडणूक लढणार आहे,’ असे ते म्हणाले.
‘पर्रिकर परिवार हा भाजप परिवार’ – फडणवीस
आम्हाला पर्रिकर परिवाराविषयी आदर आहे. उत्पल पर्रिकर आणि त्यांच्या परिवारातील कोणताही सदस्य असो, सर्व आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणे आहेत. ते सर्वजण आमच्या जवळचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हटले आहेत.