Fri. Jan 21st, 2022

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात लढवली जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी रविवारी भाजपची महत्त्वाची बैठक झाली. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस आणि महामंत्री बी. एल संतोष आणि अरुण सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणारी विधानसभा निवडणूक ही योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात लढवण्यात येईल, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना सध्या विश्रांती मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदारांचे अहवाल तयार करत आहे. कामगिरीच्या आधारावरच निवडणुकीची उमेदवारी दिली जाईल, असं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे.

यापूर्वीसुद्धा भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सरचिटणीसांची दोन दिवसीय बैठक घेतली. यात उत्तर प्रदेशसह ५ राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा केली गेली. या बैठकीत बी. एल संतोष आणि यूपी भाजपचे प्रभारी राधा मोहन सिंह हेसुद्धा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *