Thu. Jul 16th, 2020

‘कालिया’,’रॉबर्ट’, ‘बळी’ विविध भूमिकांतून अजरामर झाले विजू खोटे!

“सरदार, मैने आपका नमक खाया हैं” हा ‘शोले’तला कालियाचा डायलॉग किंवा “गलती से मिस्टेक हो गया” हा ‘अंदाज अपना अपना’ मधला ‘रॉबर्ट’चा विनोदी डायलॉग… हे संवाद कानी पडताच एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, तो म्हणजे अभिनेते विजू खोटे यांचा. सहकलाकार असो, विनोदी भूमिका किंवा खलनायकी भूमिका… मिळालेली छोटीमोठी भूमिका अतिशय प्रामाणिकपणे रंगवत त्यातून स्वतःचा ठसा निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते ही विजू खोटे यांची ओळख.

1964 ला ‘या मालक’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

सुरुवातीला नायक म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत काम केलं खरं. मात्र त्यानंतर  तब्बल 300 हून अधिक सिनेमात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.

विजी खोटे वडिल नंदू खोटे हेही अभिनेते होते, त्यांनी अनेक मूकपटात काम केलं होतं.

तर ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या मराठी बोलपटात काम केलेल्या अभिनेत्री दुर्गा खोटे या त्यांच्या काकू.

बहिण शुभा खोटे यांनीदेखील अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केलंय.

‘शोले’ शिवाय विजू खोटे यांनी ‘कुर्बानी’, ‘कर्ज’, ‘शरीफ बदमाश’, ‘गंवार’, ‘नगिना’, ‘कयामत से कयामत तक’, ‘अंदाज अपना अपना’, ‘खिलाडी 420’, ‘पुकार’, ‘इन्सान’, ‘गरम मसाला’, ‘गोलमाल 3’, ‘पेईंग गेस्ट’ अशा अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका निभावल्या.

हिंदी सिनेमांसोबत मराठी सिनेमांतही त्यांनी खलनायकी, विनोदी अशा विविधांगी भूमिका साकारल्या.

‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील त्यांची ‘बळी’ची ही खलनायकी भूमिका विशेष गाजली.

‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘एक उनाड दिवस’, ‘अदला बदली’, ‘गोष्ट लग्नानंतरची’, ‘व्हेंटिलेटर’ अशा अनेक मराठी सिनेमांत त्यांनी काम केलं.

‘जबान संभाल के’ या प्रसिद्ध मालिकेतही त्यांची भूमिका लोकप्रिय झाली.

सिनेसृष्टीत इतका काळ कार्यरत राहाणारे आणि तरीही अगदी साधी रहाणी असलेल्या कलाकारांपैकी विजू खोटे यांचं  नाव घेता येईल. या जगातून निरोप घेऊनही आपल्या अभिनायातून नेहमीच प्रेक्षकांच्या सोबत राहातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *