मुद्दल फेडतो, व्याज विसरा; विजय मल्ल्याची ऑफर

भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दाखविली आहे. मी 100 टक्के कर्ज फेडायला तयार आहे, मी मुद्दलीची परतफेड करु शकेन पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही मल्ल्याने केला आहे.
विजय मल्ल्याने ट्विटरवरुन बँकांच्या थकीत कर्जावर भाष्य केले आहे. किंगफिशर मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून गेल्या 3 दशकापासून कंपनी भारतात व्यवसाय करत आहे. आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपये दिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सनेही अनेक राज्यांना मदत केली होती. पण दुर्दैवाने किंगफिशर एअरलाइन्सचे नुकसान झाले. तरीही मी बँकांना कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करायला तयार आहे. यामुळे बँकांचेही नुकसान होणार नाही, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.
एअरलाइन्स कंपनीला विमानाचे इंधन महागल्याचा फटका बसला. यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आणि बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम हे नुकसान भरुन काढण्यात खर्च झाली. मी बँकांना 100 टक्के मुद्दल फेडायला तयार आहे. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असे ट्विट विजय मल्ल्याने केले आहे.
प्रसारमाध्यमं आणि नेतेमंडळी माझ्यावर बँकांचे कर्ज बुडवून पसार झाल्याचा आरोप करतात. पण त्यात तथ्य नाही. मला निष्पक्ष वागणूक का दिली जात नाही, असा सवालही त्याने यावेळी विचारला आहे.