Wed. Apr 21st, 2021

पुतिन २०३६ पर्यंत रशियाच्या सत्तेत कायम

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन आता आणखी दोन कार्यकाळांसाठी म्हणजेच २०३६ पर्यंत रशियाच्या अध्यक्षपदी राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सरकारी कागदपत्रावर स्वत: पुतिन यांनी स्वाक्षऱ्या करत त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. ६८ वर्षीय पुतिन गेली दोन दशकं रशियाची सत्ता उपभोगत आहेत.

रशियाच्या संसदेने तशा प्रकारची घटनादुरुस्ती केल्यानंतर ब्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी या कागदपत्रांवर सह्या केल्या. गेल्या वर्षी रशियात सार्वमत घेण्यात आलं होतं, त्या आधारावर ही निर्णय घेण्यात आल्याचं सरकारी कागदपत्रात सांगण्यात आलं आहे. ब्लादिमिर पुतिन यांचा सध्याचा कार्यकाल हा २०२४ साली संपणार आहे. रशियाच्या राज्यघटनेतील नियमानुसार, कोणतीही व्यक्ती रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी दोन पेक्षा जास्त कार्यकाल राहू शकत नाही. पण या आधी ब्लादिमिर पुतिन यांच्यासाठी या नियमात बदल करून घटनादुरुस्ती करण्यात आली होती. आताही तशाच प्रकारची घटनादुरुस्ती करण्यात आली असून त्यानुसार २०२४ साली पुतिन यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना पुढील २ कार्यकाळ, म्हणजे २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहता येणार आहे.

ब्लादिमिर पुतिन हे सर्वप्रथम २००० साली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर चार वर्षाच्या सलग दोन कार्यकाळांनंतर सत्तेत राहिल्यानंतर २००८ साली त्यांची जागा मेदवेदेव यांनी घेतली. २०१२ साली पुतिन हे पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. २०१८ साली पुन्हा एकदा, चौथ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर पुतिन राष्ट्राध्यक्ष बनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *