जेव्हा श्राद्धाच्या वेळी मृत व्यक्ती खरंच घरी परत आली!

आपल्या जग सोडून गेलेल्या नातेवाईकांसाठी श्राद्ध करण्याची प्रथा हिंदू धर्मात असते. श्राद्धाद्वारे आपल्या मृत नातेवाईकाचं स्मरण केलं जातं. त्याच्या आत्म्याला सद्गती लाभावी, अशी प्रार्थना केली जाते. मात्र जर श्राद्धाच्या वेळी मृत व्यक्ती चक्क पुन्हा घरी आली तर? असाच प्रसंग बिहारमधील ठाकूर कुटुंबात घडला.
काय घडलं ठाकूर कुटुंबात ?
मुझफ्फरपूर येथील बुधनगरा गावात राहणारा संजू ठाकूर या व्यक्तीच्या बाबतीत घडलाय.
संजू ठाकूर हा गतिमंद होता.
तो ऑगस्ट महिन्यापासून घरातून बेपत्ता झाला होता.
त्यानंतर त्याचे वडील रामसेवक ठाकूर यांनी पोलिसात तक्रार केली.
पोलिस संजूचा शोध घेऊ लागले. पण बऱ्याच दिवसांनंतरही संजूचा काही पत्ता लागला नाही.
दरम्यान गावातील एका नाल्याजवळ संजू सारखाच दिसणाऱ्या एका इसमाचा मृतदेह पोलिंसाना आढळून आला.
त्याची माहिती पोलिसांनी रामसेवक ठाकूर यांना दिली.
यानंतर रामसेवक यांनी तो मृतदेह संजूचा आहे असे सांगत तो मृतदेह ताब्यात घेतला. त्यांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले.
अंत्यसंस्कारांनंतर जेव्हा श्राध्द विधी सुरू होते, तेव्हा अचानक संजू अचानक घरी आला.
खरा संजू जिवंत आहे, आणि तो सुखरूप परत आलाय, हे कळल्यावर घरच्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
घरच्यांनी तो इतके दिवस कुठे होता याची चौकशी केल्यावर आपण श्रीमद् भागवत कथेच्या कार्यक्रमाला गेलो आणि तेथेच हरवलो असल्याचं त्याने सांगितलं.