Thu. Apr 22nd, 2021

‘त्या’ चप्पलविक्रेत्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?

वर्षानुवर्षं रस्त्याच्या कडेला चप्पल विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेता फरीद अहमद याच्यावर अत्यंत दुर्धर प्रसंग ओढावला. माल जप्त करण्यासाठी पालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने त्याचा पाठलाग केला. तेव्हा माल आणि हातगाडी जप्त करतील या भीतीने गाडी घेऊन पळणाऱ्या फरीदचा हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या या जुजबी कारवाई विरोधात स्थानिक नागरिक आणि विक्रेत्यांमध्ये संताप आहे.

काय घडलं नेमकं?

दुपारच्या सुमारास पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कासारवडवली येथील ‘विजय पार्क’ परिसरात रस्त्याच्या बाजूला हातगाड्यांवर फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यावर सातत्याने कारवाई सुरू केली.

हजारो रुपयांचा माल जप्त करून हातगाड्या तोडण्याचा नवा फंडा पालिका अतिक्रमण विभागाने अंगिकारला.

रोज पालिका अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांकडून 30 ते 40 रुपयांची पावती फाडून घेत.

तसंच कधीही कारवाईसाठी पालिका पथक जेसीबी घेऊन यायचे

फेरीवाल्यांच्या गाड्या तोडून माल जप्त करून हजारो रुपयांचे नुकसान करत होते.

पालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईने सर्वसामान्य फेरीवाल्यांचं जिणं हराम झालंय.

6 फुब्रुवारी रोजीही पालिका अतिक्रमण विभाग अशाच विध्वंसक कारवाईसाठी आले.

रस्त्याच्या कडेला बसलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या पकडल्या.

त्याचठिकाणी जवळच असलेल्या फरीद अहमद याचीही गाडी पकडली.

फरीदने कशीबशी गाडी सोडवून माल आणि गाडी घेऊन पळू लागला.

आत्ताच कर्ज काढून माल भरला, तोही जमा होईल आणि गाडीही तुटेल या भीतीने तो पळत सुटला.

त्याच्या पाठीमागे अतिक्रमण विभागाचे पथकही पळत होते.

काही अंतरावर गेलेल्या फरीद याची दमछाक झाली.

धास्तीने त्याला हृदयविकाराचा झटका आला अन फरीद अहमद खाली पडला.

त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हजारो रुपयांचा माल आणि गाडी वाचवण्यासाठी फरीदचा लाखमोलाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली.

विजयपार्क परिसरात फेरीवाले, बघे आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

तणावही निर्माण झाला होता.

फरीदच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतक फरीद हा कुटुंबातील एकमेव कमविणारा व्यक्ती होता.

पाच मुली आणि तीन मुले आणि पती-पत्नी अशा दहा जणांचा उदरनिर्वाहाचा गाडा फरीद ओढत होता.

फेरीवाल्याचा धंदा तो मागील 20 वर्षांपासून करीत होता.

रस्तारुंदीकरण झाल्यानंतर पालिकेची टोळधाड कधीही कारवाईसाठी येत असल्याने आधीच फेरीवाले अस्वस्थ होते.

त्यातच अगोदरच्या कारवाईत माल जप्त झाल्याने फरीदने कर्ज घेऊन माल भरला होता.

हाच माल वाचवण्यासाठी फरीदने प्राण गमावले.

कमवणारा गेला, आता कुटुंबाने करायचे काय? असा मोठा प्रश्न या कुटुंबासमोर आणि नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *