Tue. Sep 29th, 2020

पुरूष ‘या’ गोष्टीला एवढे का घाबरतात?

माझ्या मावशीच्या बाळंतपणाच्या वेळी मी तिच्या सोबत होती. आजीची परिस्थिती बेताची असल्यामुळे मावशीचं बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमध्ये झालं. मी तिच्याजवळच तिची काळजी घेण्यासाठी थांबलेली असायची. यावेळी आसपास निरीक्षण करणं हाच एक विरंगुळा होता. सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत होते.

याच हॉस्पिटलमध्ये आठवड्यातील एका ठराविक दिवशी आसपासच्या खेड्यांमधील स्त्रियांची कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन्सही व्हायची. एकाच दिवशी 10 ते 12 स्त्रियांची ऑपरेशन्स व्हायची. त्या दिवशी ऑपरेशन आधी स्त्रियांचा चेकअप चालू होता. BP, शुगर, मेंटल कंडीशन ऑपरेशनसाठी तयार आहे का? हे ही पाहिलं जात होतं. दहा-बारा स्त्रियांमधून एका स्त्रीला वगळून बाजूला थांबवण्यात आलं होतं. “तुमचं ऑपरेशन होल्डवर ठेवलंय आणि आम्हाला तुमच्या मिस्टरांसोबत थोड बोलायचं आहे”, असं तिला सांगण्यात आलं होतं.

पुरुषांचं पुरुषपण!

त्या वेळेस माझी माझ्या मावशीची औषध आणण्याची लगबग सुरू होती, मी आणलेली औषध बरोबर आहेत का हे दाखवण्यासाठी डॉक्टरांच्या केबिन समोर गेले. केबिनमध्ये पेशंट असल्यामुळे मी बाहेर थांबले होते. पण आतील सगळी चर्चा माझ्या कानावर येत होती. आतमध्ये त्या थांबवण्यात आलेल्या स्त्रीचा नवरा होता. त्याला डॉक्टर समजावून सांगत होते की तुझी बायको कुटुंबनियोजनाच्या ऑपरेशनच्या कंडिशनमध्ये नाहीये. तिचं आधीचं 2 सीजरेयन, अपेंडिक्स ऑपरेशन, लॅप्रोस्कोपी झाली आहे, त्यामुळे तिचं ऑपरेशन केलं तर तिच्या जीवाला धोका आहे. एकच नव्हे, तर तीन तीन डॉक्टर त्याला समजावून सांगत होते.

नवरा सगळं शांतपणे ऐकत होता. तर त्यातल्या एका डॉक्टरने त्याला सल्ला दिला की तुम्ही तुमच्या पत्नीचा जीव धोक्यात घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच आपलं ऑपरेशन का नाही करून घेत? त्यावर मात्र त्याची प्रतिक्रिया बदलली. तो संतापला. ‘मला ते शक्य नाही’ असं स्पष्ट केलं. समोर लॅपटॉप होता आणि त्यात तिन्ही डॉक्टर त्याला प्रोसीजर समजावून सांगत होते. नसबंदीने पुरुषाचं पुरुषत्व कधी जात नसतं, फक्त त्याच्यामध्ये तुमची स्पर्म डक्ट कट केली जाते. तुम्ही तुमच्या पत्नीचा जीव धोक्यात घालू नका. तिला ऑपरेशनमध्ये होणारा त्रास देखील त्यांनी त्याला सांगितला. पण तो त्याच्या मतावर ठाम होता.

मग डॉक्टर तरी काय करणार?

शेवटी डॉक्टरांनी असं जाहीर केलं की माफ करा आम्ही तुमच्या पत्नीचं ऑपरेशन नाही करू शकत. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे आहात. तुम्ही म्हटलं तर तुमचं ऑपरेशनचा केलं जाईल. पण तुमच्या पत्नीचं नाही. त्यावर तो तिथे काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेला मी बाहेर बसून हे सगळं ऐकलं होतं. आणि माझ्या समोर दिसत होती ती स्त्री जी आपल्या कुटुंबासाठी नवऱ्यासाठी भवितव्यासाठी हे ऑपरेशन करण्यासाठी आली होती. जो प्रश्न डॉक्टरांच्या मनात होता तसाच प्रश्न माझ्याही मनात होता. की तो नेमकं काय करेल? तो निघून गेला.

मी त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी बघितलं होतं. या आधीही त्यांनी बऱ्याच सरकारी दवाखान्यात ऑपरेशनसाठी प्रयत्न केला होता. पण तिची कंडिशन बघता कुणीही तिच ऑपरेशन करायला तयार होत नव्हतं. माझं लक्ष नवऱ्याकडे होते की तो काय करतोय. तो आपल्या पत्नीला गाडीमध्ये बसवून निघून गेला. मी क्षणभर विचार केला, तिला ऑपरेशन करायला लावलं नाही, हे बरंच झालं. पण नंतर मला कुजबूज ऐकू आली की तो नवरा तिला खासगी दवाखान्यात नेऊन तिचं ऑपरेशन करणार आहे.

त्या गोष्टीला दोन दिवस उलटले तरी माझ्या मनात ऑपरेशन झालं असेल का? हा प्रश्न होताच. हे विचारणार कोणाला? एका अनोळखी पण डॉक्टरांच्या बोलण्यातून माझं त्या स्त्रीशी एक नातं निर्माण झालं होतं. त्या ठिकाणी असणाऱ्या नर्सची चर्चा चालू होती की पेशंट दगावल्याची. आधी ही चर्चा ऐकून मला धक्काच बसला. दगावलेला पेशंट ती स्त्री तर नाहीये ना! मग मनात असं आलं, की या नर्स आहेत. यांच्या हाताखालून रोज बरेच पेशंट जात असतील. त्यातच कोणीतरी असेल.

ती भीती खरी ठरली…

त्या महिलेला ऑपरेशनसाठी खाजगी हॉस्पिटलला घेऊन गेले होते.

ऑपरेशन झाल्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाला होता.

व्हिजिटला आलेले डॉक्टरांनी हळहळ व्यक्त केली. ते म्हणाले-

“जेव्हा आम्ही एखादं ऑपरेशन होणार नाही असं म्हटतो, तेव्हा लोकांना वाटतं सरकारी दवाखान्यात डॉक्टर काम टाळत असतात. पण कालच्या पेशंटला आम्ही काही विचार करूनच ऑपरेशनसाठी नकार दिला होता. त्या पेशंटच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं हे आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या बाईला आपला जीव गमवावा लागला.”

डॉक्टर निघून गेल्यावरही वातावरणात तणाव होता.

डोळ्यांसमोर दिसत होती, ती त्या दिवशी आलेली स्त्री. ती आज या जगात नव्हती.

एका आजींचं बोलणं आठवलं. ’बाळंतपण हा बाईचा दुसरा जन्म. त्यात ती जगली तर ठीक. नाहीतर तुम्ही मेला की नवरा दुसर लग्न करेल आणि रिकामा होईल.’ हे सगळं झाल्यानंतर माझ्या मनात खूप प्रश्न पडायला लागले.

स्त्रीचा बाळंतपणावर जेवढा तिचा अधिकार आहे. तेवढीच तिची काळजी घेणे हे नवऱ्याचं कर्तव्य नव्हे का?

कदाचित डॉक्टरांनी दिलेला तो सल्ला तिच्या नवऱ्याने ऐकला असता तर ती आज जिवंत असती.

ज्या मुलांना जन्म देण्यासाठी इतक्‍या असह्य वेदना सहन केल्या होत्या, त्यांच्याबरोबर आयुष्य घालवता आलं असत.

आज त्या नवऱ्याच्या मर्दुमकीच्या खोट्या समजामुळे ती मुलं पोरकी झाली.

पुरुषाने नसबंदी केली तर त्याचं पुरुषत्व कमी होतं हा समज या गैरसमजातून बाहेर येणं गरजेचं आहे.

तर बाळंतपण, प्रजननक्षमता या निसर्गाने दिलेल्या गोष्टी. त्या बंधनकारक निश्चितच नाहीत. स्त्री या गोष्टी स्वीकारूही शकते किंवा नाकारूही शकते.

मग ती भलीमोठी सेलिब्रिटी असो वा सामान्य घरातील स्त्री. पण पुरुषांचं काय?

ते कधी हे वास्तव समजून घेणार?

त्यांची भीती कधी दूर होणार?

कुटुंबावर येणारं संकट त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी स्वतःवर झेलणारे, समस्यांशी दोन हात करणारे, पुरुष म्हणून आपला अहंकार मिरवणारे पुरुष या एका गोष्टीला इतके घाबरतात, की त्यापुढे त्यांना कुटुंबाचीही काळजीही राहत नाही? कुटुंबाची काळजी घेऊ शकणारा कर्ताच तर खरा पुरूष असतो ना? पत्नीच्या सुखदुःखातील जोडीदार, मुलांचा हिरो असणारा पुरूष या एका गोष्टीला एवढा का घाबरतोय?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *