Sun. Jul 5th, 2020

यवतमाळ येथे ११ लाखांची घरफोडी

यवतमाळ : वर्दळीच्या आर्णी मार्गावरील सत्यनारायण ले-आऊटमध्ये रविवारी तब्बल ११ लाखांची घरफोडी झाली. विशेष म्हणजे या घरी दहा दिवसापूर्वीच मुलाचा विवाह सोहळा पार पडला होता.

गणेश शिवराम जाधव हे कुटुंबासह दारव्हा येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. सायंकाळी ५.३० वाजता जाधव कुटुंब घराबाहेर पडले. रात्री १०.१५ च्या सुमारास घरी परत आले. त्यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर धक्कादायक चित्र पहायला मिळाले.

चोरट्याने किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला होता. चोरट्याने बेडरुमच्या दाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेथे असलेले कपाट फोडले. नंतर वरच्या मजल्यावर असलेले कपाट फोडले.

इतकेच नव्हे तर घरातील लाकडी कपाटही फुटलेले दिसले. त्यातील वस्तू अस्ताव्यस्त पडून होते. या चोरट्याने घरात प्रवेश करताना किचनच्या बाहेर असलेल्या कुदळीच्या सहाय्याने खिडकीचे ग्रील तोडले. हे दृश्य पाहून काही वेळ जाधव कुटुंबियांना जबर हादराच बसला. नंतर त्यांनी घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली.

ठाणेदार आनंद वागतकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. ठसे तज्ज्ञही तेथे आले. श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र ते तेथेच घुटमळले. ठसे तज्ज्ञांना काही ठोस हाती लागले नाही.

या चोरट्याने २७० ग्रॅम सोने आणि ८० हजार रुपये रोख रक्कम असा ११ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गणेश जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

फक्त सोन्याचेच दागिने त्याने घेतले. यावरून चोरटा सराईत असल्याचे दिसून येते. त्याने घरात खिडकीचे ग्रील तोडून प्रवेश केला. मात्र जाताना घराच्या मागचे दार उघडून निघून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *