अनैतिक संबंधांतून हत्या, आरोपींनीच केला व्हिडिओ शूट

पुणे शहरातील बालेवाडी भागात राहणाऱ्या रोहिदास बालवडकर या 55 वर्षीय व्यक्तीची परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील इटाळी शिवारात धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मानवत तालुक्यातील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर मयताला आपल्या मोटर सायकलवर बसून इटाळी शिवारात फेकून देत असतांना आरोपींनी व्हिडीओ तयार केलाय. तोच व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला असून पोलिसांनी प्रमुख आरोपी विठ्ठल काळे,नारायण राठोड, आणि महादेव चिंतामणी या तिघांना अटक केलीये.
अटक केलेला प्रमुख आरोपी आपल्या कुटुंबासोबत पुण्यात बालेवाड़ी येथे राहतो. बालवडकरही त्याच परिसरात राहत असल्याची माहिती आहे. आरोपी हा पुण्यातून 18 फेब्रुवारीला आपल्या मानवत तालुक्यातील थारवांगी गावी आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी बालवडकर देखील पुण्यातून थारवांगीला आला. त्याची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहे.