Tue. Dec 7th, 2021

आई वडीलांनी मोलमजुरी करून मुलाला केलं साहेब, UPSC पास करणाऱ्या नितीनची संघर्षगाथा!

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वचनाने प्रेरित होऊन बुलढाण्याच्या नितीन इंगळे नामक युवकाने यशाचं शिखर गाठलं आहे. हे शिखर गाठण्याच प्रवास अजिबात सोपा नव्हता. घरातील दारिद्र्य, शिक्षणाला पैसे नाहीत अशा कठीण परिस्थितीतही जिद्दीच्या बळावर नितीन DYSP झाला आहे.

नितीनचे वडील श्रीकृष्ण इंगळे 10 पर्यंत शिकलेले, तर आईने कधी शिक्षणच घेतलेलं नाही. अशा कुटुंबात नितीनने मात्र मोठं अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलं. ते पूर्ण करण्यासाठी मार्ग सापडत नव्हता. मुलाच्या स्वप्नासाठी संपूर्ण कुटुंबानेही परिश्रम घेतले. आई वडील आणि बहीण यांनी त्याला धीर देत लोकांच्या शेतात मजुरी करणं सुरू केलं.

100 रुपये रोजंदारीवर ते कामे करू लागले आणि पैसा जमा करत नितीनच्या शालेय खर्च करत होते.

घरी एक वेळच जेवण मिळणं कठीण होतं. मात्र मुलगा अधिकारी बनवायचं स्वप्न डोळ्यासमोर होतं.

रात्रीच्या शिळ्या भाकऱ्या खाऊन नितीनने आपलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केलं.

त्यानंतर UPSC च्या तयारीला तो लागला. मात्र आता UPSC साठी लागणारा खर्च कोण करणार?

आपली परिस्तिथी अतिशय नाजूक. खाण्यापिण्याचीही सोय नाही.

पण आई वडिलांनी आणि बहिणीने त्याला धीर देत प्रोत्साहन दिलं.

भाऊ मोठा साहेब होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही असा निर्धार त्याच्या बहिणीने केला.

अनेकांच्या तोंडातून येणाऱ्या उलट सुलट प्रशांना उत्तरे देत होती.

भावाला लागणाऱ्या खर्चासाठी तिने खाजगी कंपनीमध्ये जॉब केला.

पडकं घर, पोटपाण्याचा गंभीर प्रश्न हे सर्व डोळ्यांसमोर असताना भावाला मोठा साहेब बनवायचं याच स्वप्नाला प्राधान्य देऊन तिने बाकी स्वप्नांकडे दुर्लक्ष केलं.

लोकांच्या घरी, शेतात काम करून त्याच्या आईवडिलांनी नितीनला पैसा पुरविला. इतकंच नव्हे तर जवळ असलेली पाऊण एकर शेतीदेखील विकून टाकली आणि नितीनचा खर्च पूर्ण केला. आज नितीन हा UPSC पास होऊन मोठा साहेब झाला त्याचा खूप आनंद आईवडिलांना झालाय. संपूर्ण परिवाराने केलेल्या त्यागाचं चिज झालं आणि मोलमजुरी करणाऱ्यांचा मुलगा साहेब झाला.

आजही नितीन पडक्या घरात राहतो. त्याच्या घराला साधे दरवाजेही नाहीत. मात्र अशाही परिस्थितीत सर्व संकटांवर मात करून नितीनने यशाचं शिखर गाठलंय. त्याची कथा निश्चितच सर्वांना प्रेरणा देत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *