आता Twitter वर होतेय सर्फ एक्सेलची ‘धुलाई’!

वॉशिंग पावडर Surf Excel च्या नव्या जाहिरातीमुळे सध्या इंटरनेटवर वाद सुरू झालाय. होळीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या सर्फ एक्सेलच्या नव्या जाहिरातीत धार्मिक एकतेचा विषय मांडण्यात आलाय. मात्र ही जाहिरात अनेकजणांना खटकली आहे. त्यामुळे Twitter वर #BoycottSurfExcel हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे.

 

असं काय आहे या जाहिरातीत?

 

या जाहिरातीत एक लहान हिंदू मुलगी आपल्या मुस्लिम मित्राला होळीच्या रंगांपासून वाचवत मशिदीपर्यंत नेते, असं दाखवण्यात आलंय.

पांढरेशुभ्र कपडे घातलेला मुस्लिम मुलगा नमाज पढण्यासाठी मशिदीत निघाला आहे.

मात्र गल्लीत रंगपंचमी खेळणाऱ्या मुलांमुळे त्याला मशिदीत कसं जायचं असा संभ्रम आहे.

त्याची बालमैत्रीण त्याला सायकलवरून घेऊन जाते आणि विविध रंगांच्या उधळणीपासून वाचवते.

मशिदीच्या पायऱ्या चढत असताना ती त्याला ‘तुझा नमाज पढून झाल्यावर मी तुला रंग लावणार’ असं सांगते.

यावर तो मुलगाही हसतो.

धार्मिक एकतेचे रंग दाखवण्याचा प्रयत्न या जाहिरातीमध्ये केलाय.

तरीही अनेकजणांना ही जाहिरात खटकली आहे.

 

बाबा रामदेव चिडले

हिंदुस्तान युनिलीव्हरचं प्रोडक्ट असणाऱ्या सर्फ एक्सेलच्या जाहिरातीवरून प्रतिस्पर्धी पतंजली कंपनीचे प्रमुख बाबा रामदेव यांनी टीका केली आहे. आपण कोणत्य़ाही धर्माच्या विरोधात नाही. मात्र सध्या जे सुरू आहे, त्यांच्याबद्दल गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या विदेश सर्फने आपण कपडे धुवायचो, त्याच सर्फची धुलाई करण्याची वेळ आली आहे.

 

 

ही जाहिरात अनेकजणांना खूपच आवडली आहे, तर अनेक जणांना मुळीच आवडली नाहीय. त्यामुळे आता सर्फ एक्सेल ही जाहिरात बदलणार का, असा प्रश्न आहे.

Exit mobile version