Tue. Aug 9th, 2022

ईडी विरोधात काँग्रेसचा टाहो

MRUNALI CHAVAN

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मागे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी ची चौकशी लागली आहे. ‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती. ईडीनं या प्रकरणाची फाईल २०१५ मध्ये बंद केली होती. मात्र, पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला सुरुवात केली आहे.
सोनिया गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलावलं गेलं. याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या विरोधात विविध ठीकाणी आंदोलन सुरु असतानाच मुंबईतील काँग्रेस युवा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. बोरिवली स्थानकावर हे आंदोलन करण्यात आले असून गुजरातकडे जाणारी सौराष्ट्र एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न यावेळी केला गेला. यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. याचपार्श्वभूमीवर कल्याणमध्ये देखील कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं. दरम्यान दिल्ली संसद भवन परिसरात काँग्रेसच्या खासदारांनीही आंदोलन केले. तसेच रघुपति राघव राजाराम हे महात्मा गांधी यांचे आवडते भजन म्हणत नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयावर पोहचले. या मध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्ता देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या केंद्र सरकार आणि केंद्रीय एजन्सी जाणूनबुजून विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सोनिया गांधी यांना कितीही वेळा चौकशीसाठी बोलावलं तरी काँग्रेस कार्यकर्ते रोज आंदोलन करतील. आम्ही आंदोलनाला घाबरणारे नाही असं म्हणत कार्यकर्त्यांनी निषेध दर्शवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.