उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी आणखी एक टीझर जारी

औरंगाबाद शहरात 8 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून गेल्या एक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. तर सभेला एक दिवस शिल्लक राहिला असताना शिवसेनेकडून आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. ज्यात पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच ‘हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर’ अशी हाक शिवसैनिकांना देण्यात आली आहे.
मराठवाड्यात शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना ८ जून १९८५ रोजी झाली. त्यामुळे या शाखेच्या ३७व्या वर्धापनाचेनिमित्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे ८ जून रोजी औरंगाबादेत शिवसेनेची सभा पार पडणार आहे.
औरंगाबादमध्ये पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेनंतर आता उद्धव ठाकरेंच्या सभेची चर्चा होत आहे. ज्या मैदानावर राज यांची सभा पार पडली त्याच मैदानावर उद्धव यांची सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक सभा गाजवल्या होत्या. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या सभेला सुद्धा महत्व आले असून, या सभेत ते काय बोलणार यांची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी पार पाडण्यासाठी शिवसेनेचे सर्वच स्थानिक नेते कामाला लागले आहे. तर शहरातील सर्वच महत्वाच्या चौकात, जालना रोड आणि सभास्थळाच्या भागात मोठ्याप्रमाणावर होर्डिंग लावण्यात आले आहे. तसेच मुख्य रस्त्यांवर भगवे झेंडे लावण्यात आले.