औरंगाबादमधील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि त्यानंर आता औरंगाबादमध्येही शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबादमधील मनपा हद्दीतील पहिली ते आठवीचे वर्ग येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून औरंगाबादमध्ये मंगळवारी दिवसभरात १०३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ३१ जानेवारी पर्यत शाळा बंद असल्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी घेतला आहे.
पुण्यातील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुण्यातील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत.
मुंबईतील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेने शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुंबईसह ठाणे आणि नवीमुंबई येथील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद असणार आहेत. मात्र या कालावधीमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन सुरू राहणार आहेत.