Fri. Jun 18th, 2021

कृषीमंत्र्यांच्या विहिरीतील पाणी दूषित!

महाराष्ट्राचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या शेतातील विहिरीचे पाणी दूषित झाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदगाव पेठ एमआयडीसी लगत कृषीमंत्र्यांसह अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी खराब झालंय. त्यामुळे संत्री तसंच इतर पीक दूषित पाण्यामुळे नष्ट झाली आहेत.

अमरावतीच्या नांदगावपेठ MIDC त असणाऱ्या सर्व कारखान्यांमधील दूषित पाणी SMS या खासगी जलशुद्धीकरण केंद्रात पाठवलं जातं.

गेल्या 3 वर्षांपासून दरररोज हजारो लिटर दूषित पाणी जमिनीत मुरत असताना या पाण्याचा झरा लगतच्या शेतातील विहिरींमध्येही पोहोचला आहे. या विहिरींमध्ये कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या विहिराचाही समावेश आहे.

अमरावती MIDC मध्ये SMS कंपनीला सांडपाणी शुद्धीकरणाचं कंत्राट दिलं होतं.

मात्र पावसामुळे ते सांडपाणी इतरत्र पसरलं.

त्यामुळे पाणी जमिनीत मुरल्याने परिसरातील विहिरीतील पाणी दूषित झाल्याने त्या पाण्याचा रंग बदलला आणि त्यातील TDS चं प्रमाण वाढल्यावर शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर कंपनीला सक्त निर्देश देऊन त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती देण्यात आलीय.

खुद्द कृषीमंत्र्यांनी याबाबत 5 जुलैला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दिली.

दरम्यान, आज अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते अनंत गुढे हे प्रदूषण मंडळ आणि कृषी अधिकाऱ्यांसह कृषीमंत्र्यांच्या शेतात पोहोचले.

यावेळी कृषीमंत्र्यांच्या विहिरीतील पाणी लाल-काळं झालेलं आढळून आलं.

या पाण्यामुळे अंगाला खाज सुटते, अशा तक्रारी या भागातील शेतकऱ्यांनी यावेळी केल्या.

दूषित पाण्यामुळे शेतात पीक येऊ शकत नाही, झाडांची फळे गळून पडतात तसेच झाडे सुकतात, असा अहवाल कृषी विभागानेही दिला असल्याचे यावेळी समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *