Tue. Aug 3rd, 2021

क्रॉफर्ड मार्केटचा मासळी बाजार हलवण्याविरोधात कोळी बांधव राज ठाकरेंच्या भेटीला

महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी बांधवांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येथील मच्छी मार्केट ऐरोली हलवण्यात येणार आहे. याला विरोध करतानाच कोळी महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली.

राज ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिलासा देत मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगितले.

तसंच मी स्वतः मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून तुमचा विषय मांडणार आहे.

तोपर्यंत कोणीही आले तरी तुम्ही तिथून हलू नका, असं राज ठाकरेंनी कोळी बांधवांना सांगितलं.

महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी महिलांना महापालिकेच्या वतीने जागा खाली करण्याची नोटिस देण्यात आली आहे.

तसंच त्यांचं कायमस्वरूपी ऐरोली येथे स्थलांतरीत केलं आहे. त्या विरोधात तेथील कोळी महिला, माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या शिष्टमंडळ आज कृष्णकुंजवर जाऊन राज साहेब ठाकरे यांची भेट घेतली.

क्रॉफर्ड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार असलेल्या शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरली आहे.

येथील बाजार आता मानखुर्द-ऐरोली या जकात नाक्याच्या जागेवर हलवला जाणार आहे.

महापालिकेच्या या निर्णयाचा तीव्र विरोध आता मच्छिमारी संस्थांकडून होऊ लागलाय.

महापालिकेने 1 ऑगस्टपर्यंत सकारात्मक कार्यवाही करून पुनर्वसनाचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने दिला आहे.

कॉफ्रर्ड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार भरल्या जाणार्‍या शिवाजी महाराज मंडईची वास्तू धोकादायक बनल्याने या मंडईतील सर्व मासे विक्रेत्यांचे मानखुर्द-ऐरोली येथील जकात नाक्याच्या जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिका बाजार विभागाने घेतला आहे. यासंदर्भात मासे विक्रेत्यांना जागा खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

शिवाजी महाराज मंडईची इमारत पाच वर्षांपूर्वी धोकादायक झाल्यानंतर तळ मजला कायम राखून उर्वरीत मजले तोडण्याचे काम चालू आहे.

त्यामुळे या तळ मजल्यावरील जागेत घाऊक मासळी विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांचे पुनर्वसन क्रॉफर्ड मार्केटमध्ये करण्याची मागणी होत होती.

परंतु क्रॉफर्ड मार्केटचा रखडलेला विकास आणि अपुरी पडणारी जागा लक्षात घेता प्रशासनाने हे मच्छिमार्केट मानखुर्दला ऐरोलीच्या जकात नाक्याच्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे मासे विक्रेत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. याचा निषेध व्यक्त करत रविवारी मंडईच्या जागेत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्व मासळी विक्रेत्यांच्या संस्थांनी तीव्र आंदोलन केले होते. यावेळी कोळी समाजाचे नेते दामोदर तांडेल, भूषण पाटील, माजी महापौर नगरसेवक मिलिंद वैद्य, नयना पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *