Mon. Dec 6th, 2021

गाथा ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’च्या चळवळीची

उर्वी भांडारकर, वेब जर्नलिस्ट

भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरही मराठी बांधवांचा संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरूच होता.1947 रोजी स्वतंत्र भारताचा जन्म झाल्यानंतर भाषेच्या आधारे भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला. यासाठी Dar Commission नेमण्यात आले. भाषावर प्रांतरचना देशाची एकात्मतेला घातक असल्याचं न्या. एस के दार यांनी म्हटलं.

मात्र इतर राज्यांना भाषेच्या आधारे स्वतंत्र प्रांत मिळत होते. महाराष्ट्रासाठी मात्र मराठी माणसाला रक्त सांडावं लागलं. 107 हुतात्मांच्या बलिदानानंतर स्वतंत्र महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य जाहीर केले.

कोण होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्मे?

“मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”

15 ऑक्टोबर 1938 रोजी मुंबई येथे मराठी साहित्य संमेलन आयोजीत करण्यात आले होते. या संमेलनात स्वातंत्रवीर सावरकर यांनी सर्वप्रथम मराठी राज्याच्या स्थापनेचा ठराव मांडला होता.

1943 साली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गजानन माडखोलकर आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली.

भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर मुंबईत उद्योग कारखान्यांची मोठ्या प्रमाणात प्रगती होत असल्यामुळे भांडवलशाहींनी संयुक्त महाराष्ट्राचा विरोध केला.

भांडवलशाहींची बाजू घेत जेव्हीपी समितीने महाराष्ट्राला स्वतंत्र प्रांत जाहीर केल्यानंतरही मुंबईचा त्यात समावेश नसेल असे म्हटले.

डिसेंबर 1953 रोजी केंद्र सरकारने भाषावर प्रांतरचनेसाठी निवृत्त न्यायमूर्ती फाजल अली आयोग यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली. यावेळी सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरात वगळून इतर राज्यांना स्वतंत्र राज्य देण्यात आले. यामुळे मराठी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली.

8 नोव्हेंबर 1955 रोजी congress working committee ने मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात अशी त्रिराज्य प्रस्ताव केला आणि पुन्हा एकदा मराठी बांधव आक्रमक झाले.

18 नोव्हेंबर 1955 रोजी चर्चगेट स्टेशन येथून सुमारे 500 आंदोलकांनी मोर्चा काढला.

59 वर्षांनी संयुक्त महाराष्ट्राच्या ‘या’ हुतात्म्याला न्याय!

20 नोव्हेंबर 1955 रोजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि स. का पाटील यांनी चौपाटी येथे सभा घेतली. देशात कॉंगेसची सत्ता असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात येणार नाही असे मुख्यमंत्री मोरारजी देसाई या सभेत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे लोकांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला.

21 नोव्हेंबर 1955 रोजी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली. यावेळी गिरण्या, कारखाने, वर्कशॉप, गोदाम बंद ठेवत 4 लाख कामगरांनी यामध्ये सहभाग घेतला. त्रिराज्य योजना मोडून काढण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा कढाण्यात आला. हा मोर्चा फाऊंटनच्या दिशेने येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला. त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावेळी 15 जणांना आपला जीव गमवावा लागला.

15 जानेवारी 1956 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मोठा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश करण्यात आला, तर गुजरातमध्ये कच्छ आणि सौराष्टचा समावेश करण्यात आला आणि दोन स्वतंत्र राज्य जाहीर करण्यात आले. मात्र मुंबईला केंद शाशित म्हणून जाहीर केल्यामुळे मुंबईची जनता संतप्त झाली आणि याविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. चळवळीच्या नेत्यांचे अटक सत्र सुरू केले. कॉम्रेड डांगी आणि सेनापती बापट हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी गजाआड झाले.

16 जानेवारीपासून 23 जानेवारीपर्यंत 442 वेळा गोळीबार करण्यात आला. यामध्ये 90 जणांचा मृत्यू तर 400 हून अधिक जण जखमी झाले होते. शंकरराव देव यांनी संयुक्त परिषद बरखास्त करून चळवळीतून माघार घेतली. मात्र लढा सुरू ठेवण्यासाठी एस.एम जोशींच्या नेतृत्वाखाली ‘संयुक्त महाराष्ट समिती’ स्थापन करण्यात आली.

कम्युनिस्ट, समाजवादी, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार संघटना, सोशलिस्ट यांनी अखंड महाराष्ट्रासाठी एकत्र आले. एकीकडे अचार्य अत्रे यांनी आपल्या घणाघाती लेखनातून आणि भाषणातून सरकारवर टीका केली. तर प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा या लढाईला अधिकाधिक लोकांपर्यंत पसरवलं. त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मावळा’ या नावाने व्यंगचित्रं रेखाटून लोकांसमोर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची व्यथा मांडली. दुसरीकडे शाहीर अमर शेख डफावर थाप देत ‘जागा मराठा आम जमाना बदलेगा’ अशी ग्वाही देत होते.

27 जुलै 1956 रोजी भूमीपुत्रांनी संसदेवर धडक दिल्यामुळे सरकारने केंद्रशासित मुंबईचा निर्णय मागे घेतला.

ऑक्टोबर १९५६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरुंनी द्विभाषिक स्वतंत्र राज्य जाहीर केले. यावेळी महाराष्ट्रात मुंबईचा समावेश करण्यात आला.

संयुक्त महाराष्ट्र हे समितीच्या झेंड्याखाली मिळाल्यामुळे विधान सभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करत समितीने विजय पाप्त केला.

30 एप्रिल 1960 रोजी नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. बेळगाव, कारवारला म्हैसूर राज्यात समाविष्ट करून डांग आणि इतर मराठी भाषिक 208 गावे आणि 50 कोटी रुपये गुजरातला देऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशावर आवतरलं.

लाखोंच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रचे पहिले मुख्यमंत्री झाले.

जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमधील लढ्यातील आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिल्यानंतर मुंबईतील फ्लोरा फाऊंटन परिसरात रक्त सांडले होते. जमावावर गोळीबार केल्यानंतर 107 जणांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये 1965 साली स्मारक उभारण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *