चिमुकल्याच्या गळ्यातून आरपार गेला लोखंडी बाण!

घराच्या गेटवर चढून खेळत असताना पाय घसरून पडल्यानं गेटवर लावलेला टोकदार बाण चिमुकल्याच्या गळ्यातून आरपार केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी अखेर हा बाण काढण्यात यश आलं असून या चिमुकल्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
सार्थक करचुरे असं या लहानग्याचं नाव असून तो उल्हासनगरच्या म्हारळ गावात राहतो.
28 जून रोजी सार्थक हा त्याच्या घराबाहेरच्या गेटवर चढून खेळत होता.
यावेळी अचानक त्याचा पाय घसरला आणि गेटवर सुरक्षेसाठी लावलेला अणकुचीदार बाण थेट त्याच्या गळ्यात घुसून तोंडातून बाहेर निघाला.
यानंतर काही काळ सार्थक गेटवरच निपचित पडून होता.
त्याच्या कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तिथे डॉक्टरांनी अतिशय जिकिरीनं प्रयत्न करून हा बाण काढला आणि त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया केली.
4 दिवसांच्या उपचारांनंतर सार्थकची प्रकृती धोक्याबाहेर असून तो जेवू लागलाय.
या घटनेमुळे सुरुवातीला मोठा मानसिक धक्का बसला होता, मात्र अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याला अक्षरशः जीवदान मिळाल्याची भावना त्याच्या आजोबांनी व्यक्त केली आहे. तर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही हे काम अतिशय जिकिरीचं असल्याचं सांगत मुलांकडे लक्ष देण्याचं आवाहन पालकांना केलंय.